मुंबई: मुंबई पूर्व उपनगरातील पिण्याव्यतिरिक्त अन्य कामांसाठी वापरात असलेला पवई तलाव गतवर्षीच्या तुलनेत यंदा २४ दिवस अगोदरच भरून वाहू लागला आहे.

मुंबईत सध्या चांगलाच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे पवई तलाव हा शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे.

मुंबईला अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, मोडक सागर, मध्य वैतरणा (या मुंबईबाहेरील पाच तलावांमधून) आणि मुंबईतील भांडुप संकुल परिसरातील तुळशी, विहार या दोन कमी क्षमतेच्या दोन अशा एकूण सात तलावांमधून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असतो.

त्यामुळे पावसाळ्यात हे सर्व तलाव भरणे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे असते. मुंबईला पावसाळा संपल्यावर पुढील वर्षभरासाठी सर्व तलावांत मिळून एकूण १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता भासते. जर कमी पाऊस पडून पाणीसाठा कमी झाल्यास मुंबईकरांना पाणी कपातीला तोंड द्यावे लागते.

मात्र पवई तलावातील पाणी हे क्षारयुक्त असल्याने त्याचा पिण्यासाठी वापर करण्यात येत नाही. या पाण्याचा वापर हा प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी करण्यात येतो. पवई तलाव परिसरातील एका कंपनीला व्यावसायिक वापरासाठी आणि आरे कॉलनीत तबेल्यात वापरण्यात येते.

पवई तलाव हा मुंबई क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव आहे. सन १८९० मध्ये ४० लाख रुपये खर्चून हा कृत्रिम तलाव बांधण्यात आला आहे.

हा तलाव शनिवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. गेल्या ५ जुलै २०२० रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हा तलाव २४ दिवस अगोदरच भरून वाहू लागला आहे.

५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते.

पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती

मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here