Twitter : @maharashtracity

मुंबई

राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी राजकारण (Maratha Vs OBC politics) तापलं असताना प्रकाश आंबेडकरांच्या एका विधानाने भाष्याने राज्यात खळबळ उडाली आहे. निवडणूक निकालानंतर राज्यात दंगली उसळतील या त्यांच्या विधानानंतर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) प्रकाश आंबेडकरांवर थेट एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, देशातील काही भागात मुस्लिमांना लक्ष्य केले जात आहे. दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाला लक्ष्य केलं जात आहे. ज्यांचा या लढ्याशी आणि ओबीसींच्या लढ्याशी संबंध नाही, ते हा लढा आपल्या ताब्यात घेऊन दंगली करतील. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते, असं धक्कादायक वक्तव्य आंबेडकरांनी केले आहे. यापूर्वीही आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणानंतर राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यात अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांची एन्ट्री झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण तापल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर रोजी मुंबईत आयोजित संविधान सन्मान महासभेत हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणेंनी त्यांच्याविरोधात एफआआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अंतर्गत असून निजाम विरूद्ध रयत मराठा असा संघर्ष सुरू आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन अदृश्य शक्ती मराठा विरूद्ध ओबीसींमध्ये भांडण लावण्याचं काम करीत आहे, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकरांनी केला आहे. सांगली येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात सर्वपक्षीय नेत्यांकडून सुरू असलेल्या एकमेकांवरील टीकेवरुन सर्वच नेत्यांनी राजकीय नीतीमत्ता पाळण्याचा सल्ला दिला. येत्या ३ डिसेंबर रोजी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येईल. ६ डिसेंबरनंतर अयोध्यामधून नवी मोहीम सुरू होईल, असं विधान करताना राज्यात दंगली होतील, असा इशारा प्रत्येक पोलीस ठाण्याला मिळाल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here