@maharaahtracity

धुळे: धुळे (Dhule) जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री मातृ वंदना (Pradhan Mantri Matru Vandana) सप्ताह राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिले आहेत.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत संपूर्ण देशात सप्ताह राबविण्याबाबत शासनाकडून आदेशित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ही योजना शहरी व ग्रामीण भागात लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत १ जानेवारी २०१७ रोजी किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली आहे किंवा गर्भधारणा झाली असेल व त्यांनी शासनाने अधिसूचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल, अशाच पात्र महिलांना प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ पहिल्या जीवित अपत्यासाठीे देण्यात येतो.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याला एकूण पाच हजार रुपयांचा लाभ त्यांच्या बँक खात्यावर देण्यात येतो. लाभ देण्याचे एकूण तीन टप्पे आहेत. पहिला टप्पा एक हजार रुपये असून मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून १५० दिवसांत गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर देण्यात येतो.

दुसरा टप्पा दोन हजार रुपये असून किमान एकदा प्रसवपूर्व तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. तिसरा टप्पा दोन हजार रुपये प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्म नोंदणी व बालकास लसीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो.

ही योजना शासकीय सेवेत असणार्‍या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे. या सप्ताहात प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रे (PHC) आणि सर्व सेवा कार्यक्षेत्रांमध्ये माहिती पत्रकांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगर पालिकेचे आयुक्त अजीज शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.महेश भडांगे, महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश मोरे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here