@maharashtracity
मुंबई: मुंबईतील माजी सैनिक, सैनिक विधवा/ पत्नी यांच्या मालमत्तेस व संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तेस मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पालिकेच्या संभ्रमित भूमिकेमुळे मंजूर न होता अनिर्णित राहिला.
त्यामुळे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रशासनाने यासंदर्भातील आपली भूमिका पुढील बैठकीत स्पष्ट करावी, असे आदेश प्रशासनाला दिले.
आज स्थायी समितीच्या बैठकीत, माजी सैनिक, सैनिक विधवा/ पत्नी यांच्या मालमत्तेस व संरक्षण दलातील अविवाहित शहीद झालेल्या सैनिकांच्या नामनिर्देशित मालमत्तेस मालमत्ता करातून सूट देण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीला आला. त्यावेळी समिती सदस्यांनी, पालिका या सैनिकांच्या मालमत्तांना मालमत्ता करात १००% सवलत देणार आहे का ? ५०० चौ.फुटांच्या घरांना ज्याप्रमाणे एकूण मालमत्ता करापैकी केवळ सर्वसाधारण कर माफ करण्यात आला तसे याबाबत होणार आहे का ? असे सवाल उपस्थित केले.
त्यावर पालिका प्रशासन योग्य ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही. त्यामुळे सदस्यांचे समाधान झाले नाही. परिणामी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, प्रशासनाने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आदेश दिले.