@maharashtracity
वराईच्या नावाने मालमोटार चालकांची लूट थांबविण्याची मागणी
धुळे: जिल्ह्यात मालमोटार चालक, मालकांकडून काही व्यापारी व हमाल वराईच्या नावाखाली अवैधरित्या पैशांची वसुली करतात. ही वसुली अवैध असून शासनाच्या नियमांचा भंग करणारी आहे. यामुळे शासनाच्या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व वराईचा नावाने सुरु असलेली अवैध वसुली बंद करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या वाहतूक सेनेच्यावतीने (Shiv Sena Vahatuk Sena ) गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनात वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र अहिरे, जिल्हा उपाध्यक्ष भुषण पाटील, तालुका अध्यक्ष युवराज खताळ, श्रीकांत पाटील, चुनिलाल पाटील आदी उपस्थित होते.
याबाबत शिवसेनाप्रणीत वाहतूक सेनेने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की सर्व जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या, शासकीय गोदाम, निमशासकीय गोदाम, एम.आय.डी.सी. तील उद्योजक, साखर कारखाने, बि-बियाणे, खत व्यापारी, भाजी मंडईतील व्यापारी व हमाल संगणमत करुन वाहन चालकाची व मालकाची वराईच्या नावाने भरमसाठ लूट करीत आहेत.
हा अन्याय मोटार मालक तसेच चालक हे अनेक वर्षापासून सहन करत आहेत. शासन नियमानुसार ही वसुली अवैध आहे. तरीसुध्दा वराईच्या नावाने शासनाच्या नियमांचा भंग केला जात आहे. यामुळे जिल्हाधिकार्यांनी या प्रकरणात लक्ष घालून वाहन मालक, चालक यांच्यावर वराईसाठी होणारी सक्ती बंद करावी, ही लूट बंद न झाल्यास धुळे जिल्हा महाराष्ट्र वाहतूक सेनेतर्फे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.