@maharashtracity

धुळे: शहरातील कचरा संकलनाचा प्रश्‍न गंभीर बनल्याने आणि सर्वत्र कचरा साठत असल्याने अखेर शहराचे आमदार फारुक शाह (MIM MLA Faruk Shah) यांनी बुधवारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (UD Minister Eknath Shinde) यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतर त्यांनी कचरा संकलनाचा ठेका देण्यावर केलेली स्थगिती उठवण्यास संमती दर्शवली आहे. त्यामुळे आता पुण्यातील स्वयंभू कंपनीला कार्यादेश (work order) देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

धुळे शहरातील कचरा प्रश्नानावरून महापालिकेत सभांमध्ये मोठे वादंग निर्माण झाले होते. शहरात सध्या कचरा संकलनाचे काम करणार्‍या वॉटरग्रेस कंपनीबद्दल (Water grace) मोठया प्रमाणात नागरीक, नगरसेवकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. महापालिका स्थायी समितीत वॉटरग्रेसला काळया यादीत (black listed) टाकण्याचाही निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर त्याचे काम थांबवून नवीन निविदा काढण्याचा निर्णय झाला. त्यानुसार महापालिका प्रशासनाने नवीन निविदा प्रसिध्द केली. त्यात विविध निकष ठेवण्यात आले होते. त्यानुसार पुणे येथील स्वयंभू कंपनीची निवड करण्यात आली.

Also Read: विरोधी पक्षाने मागितला कोरोनावरील ४,७०० कोटींच्या खर्चाचा हिशेब

मात्र, त्या कंपनीला कार्यादेश देण्यापूर्वी शहराचे आमदार फारुक शाह यांनी नवीन निविदा देतांना अधिक दर दिल्याची तक्रारी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन देऊन केली होती. त्यानंतर नवीन निविदा कार्यादेश देण्यास शासनाने स्थगिती दिली होती.

त्यानंतर पुन्हा स्थायी समितीत यावर सत्ताधारीपक्षाच्या नगरसेवकांनी आमदारांवर आरोप केले होते. तर विरोधी पक्षानेही आंदोलन केली. मात्र कचरा प्रश्नावर अखेर एकमत होऊन मनपा प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून वॉटरग्रेसचे काम बंद करण्याचाही निर्णय झाला.

काही दिवसापूर्वी महापौर प्रदीप कर्पे (Mayor Pradeep Karpe) व आयुक्त देवीदास टेकाळे यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन स्थगिती उठविण्याचे निवेदन दिले व शहरातील कचर्‍याची स्थिती लक्षात आणून दिली. तर आमदार फारुक शाह यांनीही एका कार्यक्रमात नवीन निविदा कार्यादेश देण्यापूर्वी कंत्राटदाराने कुणाही पदाधिकारी व नगरसेवकाला भागीदार करणार नाही, असे लेखी मागितले होते.

तर कचर्‍याचा प्रश्न जनतेशी निगडीत असल्याने जनतेची समस्या लक्षात घेत आमदार फारुक शाह यांनी बुधवारी मंत्री शिंदे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करीत कार्यादेश देण्यावरील स्थगिती उठविण्याची विनंती केली. त्यानंतर स्थगिती उठविण्यास शिंदे यांनी संमती दिली असून तसे आदेश प्रशासनाला दिल्याची माहिती आमदार फारुक शाह यांनी दिली आहे.

यावेळी नवीन करारनामा करण्याचेही आमदारांनी सांगितले आहे. स्वयंभू कंपनीला कार्यादेश (work order) देण्यासाठी महापालिका प्रशासनाचा मार्ग मोकळा झाल्याने लवकरच कामाला सुरुवात होऊन शहरातील कचरा प्रश्न मार्गी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here