@maharashtracity
मुंबई: मुंबईला पावसाळ्यातही शुद्ध पाणीपुरवठा (Pure Drinking Water) करण्यासाठी पिसे – पांजरापूर जलशुद्धीकरण प्रक्रिया केंद्राकरिता पुढील वर्षभरासाठी १२ हजार मेट्रिक टन अधिक २५% प्रमाण एवढ्या ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड ‘ची (Polyaluminium Chloride – PAC) खरेदी १३.४८% जादा दराने पालिका प्रशासन करणार आहे.
यासाठी पालिका तब्बल १८ कोटी रुपये तीन कंत्राटदारांवर खर्च करणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव पालिका सभागृहात तातडीचे कामकाज म्हणून मंजुरीसाठी येणार आहे.
या ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ चा नियमित पुरवठा करण्यासाठी पालिकेने तीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन कंत्राटदार प्रति मेट्रिक टन १२ हजार ११९ रुपये या दराने १२ हजार मेट्रिक टन इतक्या ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ चा पुरवठा करणार आहेत.
या तीन कंत्राटदारांपैकी एक एस. व्ही. एस. केमिकल कॉर्पोरेशन हा कंत्राटदार ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ चा ५०% साठा म्हणजे ६ हजार मेट्रिक टन अधिक २५% अधिक म्हणजे १५०० मे. टन. इतका पुरवठा करणार आहे. त्यासाठी या कंत्राटदाराला पालिका ९ कोटी ८ लाख ९८ हजार रुपये मोजणार आहे.
तर दुसरा कंत्राटदार मेसर्स हितू केमिकल्स अँड अल्कलीज हा पालिकेला एकूण ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ पैकी ३०% म्हणजे ३,६०० मेट्रीक टन अधिक २५% इतका पुरवठा करणार आहे. त्यासाठी पालिका या कंत्राटदाराला ५ कोटी ४५ लाख ३९ हजार रुपये देणार आहे.
त्याचप्रमाणे तिसरा कंत्राटदार मेसर्स सिनर्जी मल्टीकेम प्रायव्हेट लि. हा पालिकेला एकूण ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ पैकी २०% म्हणजे २,४०० मेट्रीक टन अधिक २५% इतका पुरवठा करणार आहे. त्यासाठी पालिका या कंत्राटदाराला ३ कोटी ६३ लाख ५९ हजार रुपये देणार आहे.
या तिन्ही कंत्राटदारांना मिळून पालिका १८ कोटी रुपयांचे कंत्राटकाम देणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे.
पालिकेने अंदाजित केलेल्या दरापेक्षा १४.५७% जादा दर मेसर्स एक एस. व्ही. एस. केमिकल कॉर्पोरेशन या कंत्राटदाराने टेंडरमध्ये भरले होते. मात्र पालिकेने त्याच्याशी वाटाघाटी केल्यानंतर त्याने हे दर १४.५७% वरून १३.४८ वर आणले. त्यामुळे आता तिन्ही कंत्राटदार हे पालिकेला जल शुद्धीकरणासाठी आवश्यक ‘द्रवरूप पॉली अल्युमिनियम क्लोराईड’ ची खरेदी कंत्राटदाराकडून करणार आहे.
उत्पादकांच्या कच्च्या मालाच्या खरेदीत व डिझेलच्या दरात वाढ झाल्याने आणि प्रशासकीय खर्च आणि मजुरी यावरील वाढ झाल्याने कंत्राट दरात वाढ झाल्याची कारणे कंत्राटदाराने दिली आहेत.