@maharashtracity
मुंबई: नवीन शिधापत्रिकासाठी राज्य सरकारकडून विशेष मोहिम राबवण्याची सुचना देण्यात आली असून या नव्या शासन निर्णयानंतर राबवण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत काही तृतीयपंथीयांना शिधापत्रिकेचे वाटप नुकतेच करण्यात आले.
मात्र तृतीयपंथीयांना शिधापत्रिका (ration card to transgender) मिळवताना कागदोपत्री अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तृतीयपंथीय व्यक्ती हा समाजाचा घटक असून त्यांनाही सन्मानाने जगण्याचा व शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा मुलभूत अधिकार असल्याने त्यांना शिधापत्रिका देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
दरम्यान, राज्यातील एकूण एक तृतीय पंथीयांना नवीन शिधापत्रिका देण्यासाठी त्यामार्गात येणाऱ्या अडचणींचा विचार करण्यात आला. त्यांना सहानभूतीपूर्वक सन्मानाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा लाभ देण्यासाठी नियोजन सुरु झाले. सुलभ कार्यपद्धती अनुसरून प्रत्येकाच्या पात्रतेनुसार योग्य ती शिधापत्रिका देऊन त्यावरील अनुज्ञेय लाभ देण्याचा प्रस्ताव यापूर्वीच सरकारच्या नियोजनात होता. याअंतर्गत २७ सप्टेंबर २०२२ च्या नवीन शासन निर्णयानुसार २०१३ मध्ये लागू केलेल्या पद्धतीनुसार आवश्यक असलेले पुरावे सादर करण्यामध्ये राज्यातील तृतीयपंथीय नागरिकांना येणाऱ्या अडचणींचा विचार करुन त्यांना ओळखीचा पुरावा व वास्तव्याचा पुरावा सादर करण्याबाबत सूट देण्यात आली आहे.
या कागदपत्रांची संबधितांकडून मागणी करण्यात येऊ नये असे स्पष्ट पणे नमुद करण्यात आले आहे. मात्र, तृतीय पंथीय नागरिक म्हणून नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी काही नमूद बाबीपैंकी कोणत्याही एका तरी बाबीची पुर्तता करणे आवश्यक आहे. त्या बाबीनुसार त्याचे नाव मुंबई व राज्य एड्स नियंत्रण संस्था (Mumbai Aids Control Society) यांच्याकडील यादीमध्ये असावे. तसेच मतदार यादीमध्ये मतदार म्हणून नोंदणी झालेले मतदार ओळखपत्र असावे. याओळखपत्रामध्ये तृतीयपंथी असा उल्लेख असणे आवश्यक नसल्याचेही नमुद करण्यात आले आहे.