पंतप्रधान वाढदिवसाच्या निमित्ताने मेगा रक्तदान शिबिरानिमित्त राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या सुचना
@maharashtracity
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिनांक १७ सप्टेंबर रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त देशभरात मेगा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मात्र रक्तदानातून मिळालेले रक्त वाया जाण्याची अधिक शक्यता आहे. रक्तसाठा ठराविक मुदतीत वापर केल्यास वाया जात नाही. हा धोका ध्यानात घेऊन राज्य रक्त संक्रमण परिषदेने ज्या रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध आहे, अशा ठिकाणी रक्तदानाऐवजी दात्यांची नोंदणी केली जावी. ज्यामुळे भविष्यात रक्तसाठ्याचा तुटवडा भासल्यास तातडीने रक्तदाता उपलब्ध होईल, असे सुचविले आहे.
मागच्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना यासंबंधित पत्र पाठवले आहे. ही मोहीम १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त (Birthday of PM Narendra Modi) १७ सप्टेंबर रोजी रक्तदान (blood donation) अमृतमहोत्सव सुरू होत आहे. यासाठी आरोग्य सेतू पोर्टल व ई-रक्तकोशवर नोंदणी सुरू झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त एका दिवशी एक लाख युनिट रक्त जमा करण्याच्या सूचना केंद्राकडून सर्व राज्यांना प्राप्त झाल्या आहेत. या संकलनात रक्तसाठा वाया जाण्याची शक्यता अनेक संस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी वर्तविली होती. केंद्राच्या निर्देशांप्रमाणे, सर्व राज्यांचा एकत्रित सहभाग या मोहिमेला मिळणे अपेक्षित आहे. प्रत्येक राज्यातून त्यांच्या गरजेनुसार रक्त संकलन व्हावे आणि त्याचा योग्य तो वापर व्हावा तसेच प्रत्येक राज्याने एकसमान सहभाग घ्यावा, असेही नमूद आहे.