महापौरांकडून प्रकल्पाच्या ठिकाणी भेट व पाहणी
शिवसेना रहिवाशांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचे आश्वासन
जिल्हाधिकारी कार्यालय व एसआरए प्रतिनिधीची महापौर घेणार बैठक
@maharashtracity
मुंबई: कुलाबा, कफ परेड येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जागेवर असलेल्या धोबीघाटच्या ठिकाणी ब्रिटिश काळापासून राहणाऱ्या पात्र रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्याच ठिकाणी करण्यात यावे. शिवसेना या रहिवाशांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील, असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी रहिवाशांना दिले.
याप्रकरणी, जिल्हाधिकारी ( शहर) कार्यालय व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक महापौर दालनात लवकरच घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले.
कुलाबा रजक कंझ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड धोबीघाट,कफ परेड, कुलाबा येथील पुनर्विकास प्रकल्पाच्या समस्येबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांना माजी नगरसेवक गणेश सानप यांनी, पूर्वकल्पना दिली व येथील रहिवाशांचे पुनर्वसन आहे त्याच जागेवर करण्यात यावे, यासाठी महापौरांकडे रहिवाशांच्या तर्फे आग्रही मागणी केली.
या ठिकाणी ब्रिटिशांच्या काळापासून अंदाजे ४०० -५०० लोक राहत आहेत. या ठिकाणी एक धोबिघाट असून नागरिकांचा रोजगार येथेच असल्याने त्यांना हा परिसर सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरित व्हायचे नाही. मात्र ह्या जागेवर पुनर्विकास प्रकल्प एका नामांकित बिल्डरच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. परंतु सदर बिल्डरचे लोक जाणीवपूर्वक रहिवाशांना अपात्र ठरविणे, त्यांची दिशाभूल करणे आदी कारस्थाने करीत आहेत. त्यामुळे हा पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे, असा आरोप माजी नगरसेवक गणेश सानप यांनी केला आहे.
मात्र शिवसेना या रहिवाशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे. या रहिवाशांना न्याय मिळवून देणारच. येथील नागरिकांना एसआरए योजनेअंतर्गत नियमाने पक्की घरे मिळालीच पाहिजेत, असा आत्मविश्वास गणेश सानप यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हाधिकारी (शहर) यांच्या जागेवर असलेल्या संपूर्ण धोबीघाट चा पुनर्विकास करताना जिल्हाधिकारी कार्यालय तसेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय असणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी (शहर) यांच्या मालमत्ता कार्डवर नोंद असलेल्या या संपूर्ण धोबीघाटचे पुनर्वसन याच ठिकाणी झाले पाहिजे. येथील रहिवाशी यांच्याकडे असलेले पुरावे तपासून त्यांचे पात्रतेचे निकष लवकरात लवकर निश्चित करणे आवश्यक आहे.
त्यासोबतच या संपूर्ण विषयाबाबत जिल्हाधिकारी( शहर) तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या अधिकारी यांची संयुक्त बैठक महापौर दालनात लवकरच घेणार असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.