एस.टी. महामंडळाच्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्याची मनमानी

प्रवासी वर्गात देखील संताप

@maharashtracity

महाड: महाड एसटी आगाराच्या मुंबई दिशेने जाणाऱ्या बसेस पेण शहरात शिरत असल्याने होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांनी महाड आगाराच्या बसेस मधून प्रवास करण्याकडे पाठ फिरवली आहे. यामुळे आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

जलद गाड्या, शिवशाही बसेस पेणमध्ये शिरल्यानंतर वाहतूक कोंडी होत असल्याने पुढील प्रवासाला विलंब होत आहे. ज्या जिल्हा परिवहन अधिकाऱ्यांनी हा मनमानी कारभार सुरु केला आहे त्यांच्यावर नाराजी व्यक्त होत आहे.

मुंबई – गोवा महामार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असलेले महाड हे ऐतिहासिक शहर आहे. याठिकाणी असलेल्या महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एस.टी. आगारातून मुंबई, पुणे, ठाणे, जळगाव, कोल्हापूर, मिरज, आदी ठिकाणी लांब पल्ल्याच्या एसटी बसेस धावत आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाड एस.टी. आगारातून सुटणाऱ्या जलद शिवशाही बसेस पेण शहरांमधून जात असल्याने प्रवासी वर्गामध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

महामार्गाचे सुरू असलेले चौपदरीकरण आणि या कामांमुळे विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. या विस्कळीत वाहतूक व्यवस्थेमुळे आधीच प्रवास करण्यासाठी वेळ लागत आहे. त्यातच महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या जिल्हा वाहतूक नियंत्रक कार्यालयातील आलेल्या आदेशाप्रमाणे महाड एस.टी. आगारातून सुटणाऱ्या बसेस पेण शहरातून घेऊन जाण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे शिवशाही आणि जलद बसेसमधून प्रवास करणारे प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

महाड एसटी आगारातून मुंबई बोरीवली, ठाणे, कल्याण आदी ठिकाणी एसटीच्या बसेस धावत आहेत. या बसमधून शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. महाडपासून सुटणारी एसटी बस माणगाव, लोणेरे, इंदापूर, नागोठणे या ठिकाणी थांबून पेण शहरात जात आहेत. मुख्य महामार्गापासून पेण एसटी आगार जवळपास अर्धा किलोमीटर आत आहे. याठिकाणी मुख्य बाजारपेठ असल्याकारणाने याठिकाणी कायम वाहनांची वर्दळ सुरू असते.

त्यातच पेण शहरातून पुढे खोपोली शहराकडे देखील रस्ता जात असल्याने अवजड वाहने आणि अन्य वाहने देखील या मार्गावरून धावत असतात. यामुळे एसटी बसला मार्गक्रमण करताना मोठी अडचण निर्माण होते. यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

जिल्हा पोलीस जिल्हा परिवहन अधिकारी यांनी महाड आगारातून सुटणाऱ्या एसटी बसेस पेण मधूनच गेल्या पाहिजेत अशा प्रकारचा आग्रह धरला आहे. यामुळे महाराष्ट्र आगाराच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या घटून आगाराच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत प्रवाशांनी देखील संताप व्यक्त केला आहे. महाड एसटी आगारातून खूप बसेस मुंबईच्या दिशेने धावत असतात. या सर्व बसेस पेण मधून जात आहे.

याउलट खेड, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी ठिकाणाहून येणाऱ्या बसेस काही ठराविक स्थानके घेत रामवाडी येथूनच पुढे मार्गक्रमण करतात. वेगाने जाणाऱ्या या इतर आगाराच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढून महाड आगाराच्या बसेसची प्रवासी संख्या घटली आहे. एकीकडे एसटी महामंडळ उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असून दुसरीकडे मात्र अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे उत्पन्नावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here