@maharashtracity
परवानगी १५० ची गर्दी ६०० जणांची
मास्क व सामाजिक अंतर राखण्यात हलगर्जीपणा
सहाय्यक आयुक्त मकरंद दगडखैरे यांची कारवाई
मुंबई: अत्यावश्यक सेवा म्हणून राज्य सरकारने व मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनाबाबत घालून दिलेल्या नियमांचे मालाड (Malad) येथील ‘डी मार्ट’ (D’Mart) कडून उल्लंघन झाल्याचे पालिकेच्या पथकाने अचानक टाकलेल्या धाडीत उघडकीस आले आहे.
त्यामुळे पालिकेच्या ‘पी/उत्तर’ मालाडचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांनी ‘ डी मार्ट’ कडून साथरोग कायद्याचे उल्लंघन झाल्याने मॅनेजर आशीष देशमुख यांना, ‘डी मार्ट’ दिलेला परवाना रद्द का करू नये, अशा आशयाची नोटीस बजावत तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तोपर्यंत पालिकेकडून ‘डी मार्ट’ ला सील ठोकण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने अत्यावश्यक सेवा म्हणून अन्नधान्याची दुकाने, व्यापारी, दुकानदार यांना समयमर्यादा घालून देत कोरोनाबाबतच्या सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत बजावले होते. मात्र, मालाड येथील ‘ डी मार्ट’ मध्ये कोरोनाबाबतच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची खबर पालिकेच्या पी/उत्तर’ मालाडचे सहायक आयुक्त मकरंद दगडखैर यांना मिळाली.

त्यानुसार, शनिवारी ‘डी मार्ट’ मध्ये घुसून पालिकेच्या विशेष पथकाने धाड घातली. त्यावेळी ‘डी मार्ट’ मध्ये १५० ग्राहकांऐवजी चक्क ६०० ग्राहकांनी गर्दी केल्याचे, कर्मचाऱ्यांसह अनेकजणांनी मास्क (Mask) घातले नसल्याचे व सामाजिक अंतराचे पालन (Social Distance) केले नसल्याचे निदर्शनास आले.
त्यामुळे पालिकेने या घटनाप्रकाराची गंभीर दखल घेऊन ‘डी मार्ट’ वर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला. ‘ डी मार्ट’ चे शटर बंद करून सील ठोकण्यात आले आहे. तसेच, मॅनेजर देशमुख यांना नोटीस बजावत तीन दिवसात स्पष्टीकरण देण्याबाबत फर्मावण्यात आले आहे. त्यामुळे ‘ डी मार्ट’ सह मालाड परिसरातील अन्य मोठे दुकानदार यांचे धाबे दणाणले आहेत.