Twitter: @maharashtracity

मुंबई: डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श जपत, तडजोड न करता केलेल्या पत्रकारितेतून साकार झालेले आत्मचरित्र म्हणजे ‘माध्यमाच्या पटावरून’, महाराष्ट्राच्या तत्कालीन पंचवीस वर्षांतील सामाजिक, राजकीय स्थितीचे वर्णन होय या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी  पत्रकार राही भिडे यांच्या आत्मकथनपर पुस्तकाचा आज येथे प्रकाशन कार्यक्रमात गौरव केला.

मुंबई मराठी पत्रकार संघात विश्वस्त ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांच्या, ‘माध्यमाच्या पटावर’, पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, साहित्यीक विचारवंत अर्जुन डांगळे, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या उपस्थितीत झाले.

शरद पवार म्हणाले, राही भिडे यांच्या संघर्षशील स्वभावाचे मूळ मराठवाड्यातील आष्टी तालुक्यातील. तिथेच त्यांचे शिक्षण झाले. दिलेला शब्द पाळणे आणि विरोध करायचा तर शेवटपर्यंत करणे ही तेथील स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. आपल्या कठीण काळात तेथील कार्यकर्ते मजबुतीने पाठिशी उभे राहिले, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

सुशीलकुमार शिंदे यांनी राही भिडे यांचे आत्मचरित्र ही वेदनेने भरलेली आत्मकथा असे वर्णन केले. पत्रकार कसा असावा तर असा असावा, असेही शिंदे म्हणाले.

विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाही आवर्जून उपस्थित राहिलेल्या विधानपरिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी राही भिडे म्हणजे, सौम्य पण शब्दाला धार असलेली अशी मैत्रीण, असे वर्णन केले. राही भिडे यांनी भुमिका घेत पत्रकारिता केली, तशी घेणे आज अनेकांना अवघड झाले आहे, असे डॉ गोऱ्हे म्हणाल्या.

ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनी अभ्यासू, प्रचंड संघर्ष केलेल्या पत्रकार या शब्दांत भिडे यांचा गौरव केला. तर, नॅशनल हेरॉल्डच्या संपादिका सुजाता आनंद यांनी राही भिडे यांच्यासोबत अनेक वर्षे राजकीय वृत्तसंकलन करतानाच्या काळातील आठवणी जागवल्या.

लेखिका राही भिडे यांनी आपल्या मनोगतात राजकीय पत्रकारिता करतानाच्या सुरुवातीच्या काळात शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांचे खूप प्रोत्साहन लाभले अशी कृतज्ञता व्यक्त केली. मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे यांंनी यशवंतराव चव्हाणांनंतर महाराष्ट्राच्या जडणघडणीत शरद पवार यांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here