@maharashtracity

धुळे: वनचराई समझोत्या अंतर्गत मेंढपाळ-ठेलारी समाजाला मेंढी चराईसाठी मिळालेली जमीन फक्त कागदावरच असून प्रत्यक्षात ती वनजमीन दाखविण्यास किंवा देण्यास वन अधिकार्‍यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. याबाबत अनेक वेळा निदर्शने, आंदोलने करूनही वन विभागाला जाग येत नसल्याने बुधवारी महाराष्ट्र ठेलारी महासंघाने ’मुंडन’आंदोलन केले. शिवाय, येत्या 15 दिवसात वनचराईसाठीची जमीन न दिल्यास वनविभागाच्या कार्यालयाला’टाळे ठोको’आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

या आंदोलनात महाराष्ट्र ठेलारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शिवदास वाघमोडे, उपाध्यक्ष रामदास कारंडे, खजिनदार दिनेश सरग यांच्यासह अनेक ठेलारींनी मुंडन केले. तसेच मोतीलाल गरदरे, पंकज मारनर, प्रविण खामगळ, ज्ञानेश्‍वर सुळे, मोहन धिवरकर, गोविंदा रूपनर, नाना पडळकर, नाना ठेलारी, समाधान ठोंबरे, पिंटू घिवरकर, रामचंद्र पडळकर, संदीप वाघमोडे यांच्यासह ठेलारी बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.

यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुणाच्याही अध्यात-मध्यात नसलेला मेंढपाळ-ठेलारी समाज शांततेत आपले जीवन व्यतीत करीत आहे. गेल्या दीड वर्षांपासून करोनाने हाहःकार माजविला असताना ठेलारी समाजाने कधी मदतीची मागणी केली नाही. मात्र त्यांच्या हक्काचे असलेल्या वनचराई जमीनही वन विभागाने हडप केली असून केवळ कागदोपत्री ही जमीन दाखविली जात असल्याने ठेलारी महासंघाने 15 जून रोजी निवेदन देवून जागा न दाखविल्यास 30 जूनला अधिकार्‍यांचे श्राध्द घालून मुंडन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. वन अधिकार्‍यांनी या इशार्‍याकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केल्याने ठेलारी महासंघाने बुधवारी मुंडन आंदोलन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here