@maharashtra.city

मुंबई: राज्यात १३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत कुष्ठ आणि क्षयरोग शोध मोहीम अभियान सुरू करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. राज्यातील सुमारे पावणे दोन कोटी घरांना भेटी या पथकाद्वारे दिल्या जाणार आहेत. यासाठी सुमारे ६५ हजार पथके तयार करण्यात आली आहेत.

येत्या चौदा दिवसात सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल. ग्रामीण भागातील २० तर शहरी भागातील २५ घरांना दररोज भेटी दिल्या जातील. लवकर निदान व लवकर उपचार होण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात आले असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी संयुक्त कुष्ठरोग शोध अभियान आणि सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्याची सुचना केल्यावर राज्यातील कुष्ठ आणि क्षय रोगांचे लवकर निदान होऊन उपचार होण्यासाठी अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने कुष्ठ रोग आणि क्षय रुग्ण शोध मोहीम सुरू करण्यात आली. या मोहीमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयुक्त डॉ रामास्वामी एन यांनी नुकतीच बैठक घेतली. त्यावेळी या सूचना देण्यात आल्या.

तसेच आरोग्य भवन येथील बैठकीत आरोग्य संचालक डॉ. साधना तायडे, संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, सहसंचालक डॉ. आर. एस. आडकेकर, उपसंचालक डॉ. कैलास बावीस्कर, अलर्ट इंडिया संस्थेचे डॉ. व्हिन्सेंट थोनी, बॉम्बे लेप्रसी प्रोजेक्टचे डॉ. विवेक पै, महाराष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना सल्लागार डॉ. रचना विश्वजीत, कुष्ठपीडित संघटना सचिव अशोक आंबेकर आदी उपस्थित होते.

कुष्ठरोगाची लक्षणे

त्वचेवर फिकट, लालसर चट्टा येणे, त्वचेवर गाठी होणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, मनगटापासून हात आणि घोट्यापासून पाय लुळा पडणे, त्वचेला थंड आणि उष्णता जाणीव न होणे, हात पायांमध्ये अशक्तपणा जाणवणे.

क्षयरोगाची लक्षणे

दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, ताप, वजनात लक्षणीय घट होणे, थुंकी वाटे रक्त येणे, मानेवर गाठ येणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here