@maharashtracity

मुंबई: मुंबई महापालिकेने (BMC) कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या लसीकरण (vaccination) मोहिमेअंतर्गत समाजातील सर्वच घटकांना लसीचे डोस देण्याचा संकल्प सोडला आहे. पालिकेने समाजातील एक दुर्लक्षित घटक असलेल्या तृतीयपंथीयांसह एलजीबीटी (LGBT) नागरिकांसाठी विक्रोळीमध्ये (Vikhroli) विशेष लसीकरण केंद्राची सुविधा मंगळवारपासून उपलब्ध केली आहे.

त्यामुळे तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई महापालिकेतर्फे ‘एन’ विभागातील विक्रोळी (पश्चिम) येथे सेंट जोसेफ शाळेमध्ये तृतीयपंथीयांसह एलजीबीटी नागरिकांसाठी विशेष कोविड-१९ लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्राचे लोकार्पण सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी करण्यात आले.

यावेळी, मुंबई महापालिकेच्या उत्तम धोरण आणि नियोजनबद्ध कामकाजामुळे मुंबईतील कोरोना संसर्गावर योग्य नियंत्रण आले आहे, या शब्दात राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेचे कौतुक केले आहे.

मुंबईची भौगोलिक परिस्थिती आणि लोकसंख्या पाहता, कोरोनासारख्या आजाराचा संसर्ग रोखणे तसेच त्यावर नियंत्रण मिळविणे ही अत्यंत आव्हानात्मक कामगिरी होती. असे असले तरी मुंबई महापालिकेने हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले, याचे श्रेय महापालिकेच्या यंत्रणेला, उत्तम प्रशासकीय धोरणांना आणि नियोजनबद्ध कामकाजाला जाते, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी केले.

याप्रसंगी, पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) गटनेत्या राखी जाधव, एन विभाग प्रभाग समिती अध्यक्षा स्नेहल मोरे, स्थानिक नगरसेविका ज्योती हारुन खान तसेच उपायुक्त (परिमंडळ ६) देवीदास क्षीरसागर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, एन विभागाचे सहायक आयुक्त संजय सोनावणे, सहाय्यक आरोग्य अधिकारी (विलका) डॉ. (श्रीमती) शीला जगताप, एन विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र खंदाडे, एलजीबीटी बिगर शासकीय संस्थेच्या प्रिया पाटील, सलमा खान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने कोविड-१९ लसीकरण मोहिमेची व्याप्ती वाढवताना विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तृतीयपंथी व समलैंगिक नागरिकांसाठी (एलजीबीटी) विशेष लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे.

हे लसीकरण केंद्र संपूर्णपणे एन विभागाच्या आरोग्य विभागाकडून संचालित करण्यात येणार आहे. त्यासाठी एलजीबीटी समुदायाच्या हितासाठी कार्यरत बिगर शासकीय संस्थांचेही सहकार्य लाभत आहे.

मुंबई महानगरातील तृतीयपंथ व एलजीबीटी नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यासाठी हे केंद्र पुढील सहा महिने संचालित करण्यात येणार आहे. तृतीयपंथ नागरिकांकडे कोणतेही ओळखपत्र नसले तरीही त्यांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.आज पहिल्याच दिवशी दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे १०० तृतीयपंथी नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here