@maharashtracity

धुळे: युरियाच्या काळा बाजाराला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप भाजपाच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी केला आहे.

प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे आज शेतकरी संवाद अभियानाच्या निमित्ताने धुळे जिल्ह्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जावून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शेतकर्‍यांसाठी आणलेल्या योजना शेतकर्‍यांपर्यंत (Farmers) पोहचविणे, त्याची माहिती त्यांना देणे, त्याचबरोबर संघटनात्मक बांधणी करणे, शेतकर्‍यांशी संवाद साधणे हा हेतू संवाद अभियानाचा असल्याची भुमिका प्रदेशाध्यक्ष काळे यांनी मांडली.

ते म्हणाले, केंद्रातील मोदी सरकारने शेतकर्‍यांसाठी मोठ्या योजना आणल्या आहेत. खतांचे भाव नियंत्रणात आणले आहे. युरिया मुबलक प्रमाणात आहे. मात्र त्याचे परवाने, वितरण हे राज्य सरकारच्या हातात आहे.

यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी राबविल्या जाणार्‍या योजनांचा पाढा वाचला. माती परिक्षणाच्या माध्यमातून ११ कोेटी शेतकर्‍यांना सोईल हेल्थ कार्ड (Soil Health Card) दिले. कृषी क्षेत्रासाठीची तरतुद २१ हजार कोटीवरुन १ कोटी २३ लाख हजार म्हणजेच ५ पट इतकी केली. पीक विमा (Crop Insurance) योजनेतही शेतकरी हिताचे बदल केले. २२ कोटी शेतकर्‍यांना पीक विमाच्या माध्यमातून ९० हजार कोटी मिळाले. केंद्रात असताना कॉंग्रेसने (Congress) फक्त घोषणाबाजीच केली. शेतकर्‍यांंसाठी काहीही काम केले नाही. तो अनुषेश पंतप्रधान मोदी यांनी भरुन काढला आहे.

पीएम मोदींच्या शेतकर्‍यांसाठीच्या कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठीच संवाद यात्रा असल्याचे ते म्हणाले. शेती संपूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. एकीकडे राज्याच्या काही भागात अतीवृष्टी झाली आहे. पुरपरिस्थिती आहे. तर दुसरीकडे खान्देशात दुबार पेरणीचे संकट येवून ठेपले आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकार मात्र झोपलेल्या अवस्थेत आहे. त्यांना शेतकर्‍यांशी काहीही देणे-घेणे नाही.

राज्यातील आघाडी सरकारने २०१९-२० मध्ये पीक विम्याचे निकष बदलविले. त्याचा फटका शेतकर्‍यांना बसला. राज्यातील सरकार नाकर्ते आहे. त्यांच्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. हे सरकार वसुलीत मग्न आहे. त्यामुळे आघाडी सरकारला वठणीवर आणण्यासाठी शेतकर्‍यांपर्यंत जावून जनक्षोभ निर्माण करण्याचे काम संवाद यात्रेच्या निमित्ताने केले जात आहे.

कोकण, कोल्हापूर येथील पुरस्थिती पाहणीसाठी गेलेल्या विरोधी पक्षांना उद्देशून खा. शरद पवार (Sharad Pawar) यांनी पर्यटनासाठी दौरा असल्याची टिका केली होती. मात्र खा. पवार यांना जनतेचे दुःख जाणून घेण्यासाठी जाता येत नसेल तर त्यांनी जावू नये. पुरग्रस्तांचे दुःख राज्याच्या इतर भागातील जनतेला कळू नये त्यासाठीच ते विरोधकांच्या दौर्‍यांना पर्यटनाचे नाव देत आहे. त्यांची अवस्था नाचता येईना अंगण वाकडे अशी असल्याची टिकाही काळे यांनी केली.

या पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष काळे यांच्यासोबत संघटन सेक्रेटरी मकरंद कोरडे, सुधाकर भोयर, प्रदेश उपाध्यक्ष पोपट भोये, बापू खलाणे, माजी जि.प.अध्यक्ष सुधिर जाधव, जि.प.सदस्य संग्राम पाटील, उपसभापती विद्याधर पाटील, किशोर हालोर,हर्षवर्धन दहिते, विकास पवार, भास्कर पाटील,अमृत वाघ,देविदास चव्हाण, नवल पवार,सुनिल पुराणीक आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here