कस्तुरबा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड
@maharashtracity
मुंबई: जगातील १२ देशांमध्ये मंकी पॉक्स (monkey pox) विषाणूने धुडगुस घातला असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सर्व देशांना दक्षतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच मुंबई महानगरपालिका (BMC) अलर्ट झाली आहे.
मंकी पॉक्सच्या संदर्भात केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे राज्यात तंतोतंत पालन होणार असून संबंधित सर्व विभागांना केंद्रांच्या सुचना देण्यात आल्या आहेत. या सुचनांचे पालन करु, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सांगितले.
दरम्यान, मुंबईत मंकी पॉक्स या आजाराचा अद्याप एकही रूग्ण आढळलेला नाही. असे असले तरी मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारीचे विविध उपाय योजले असल्याचे मुंबई महानगरपालिकेकडून सांगण्यात आले. विमानतळावर या आजाराची लागण झालेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू आहे. यातल्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा रूग्णालयात (Kasturba Hospital) २८ खाटांचा एक वेगळा वॉर्ड बनवण्यात आला आहे.
इथल्या रुग्णांचे नमुने चाचणीसाठी पुण्यातल्या राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या (NIV) प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. इतरही रुग्णालयांमध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची माहिती कस्तुरबा रुग्णालयाला देण्याच्या सूचना करण्यात आला आहेत. मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत (Africa) मंकीपॉक्स हा आजार आढळतो. यात ताप, त्वचेवर चट्टे येणं आणि लसिका ग्रंथी सुजणे यासारखी लक्षणं यात आढळून येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.