@maharashtracity
मुंबई: मुंबईतील कुष्ठरोग पिडीत दिव्यांगांना (Divyang) मुंबई महापालिकेतर्फे (BMC) दरमहा देण्यात येणाऱ्या १ हजार रुपयांच्या आर्थिक मदतीत १ हजार ५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता या दिव्यांगांना २ हजार ५०० रुपये इतकी आर्थिक मदत मिळेल. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.
सध्या किमान ३०० कुष्ठरोग पिडीत (TB) दिव्यांग व्यक्तींना ही आर्थिक मदत देण्यात येत आहे. त्यासाठी पालिकेने अर्थसंकल्पात ४२ लाख रुपयांची तरतूद केली आहे. मात्र शिल्लक निधी पाहता पालिकेला ३८ लाख ६० हजार रुपये एवढया अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबईतील कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तींना दरमहा १ हजार रुपये एवढी आर्थिक मदत देण्याबाबतचा ठराव स्थायी समितीच्या २५ जून २०१४ च्या बैठकीत घेण्यात आला होता. पालिकेच्या वडाळा येथील ऍक्वार्थ कुष्ठरोग रुग्णालयातील कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तींना जुलै २०१४ पासून दरमहा १ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येत आहे.
दरम्यान, गुरुदत्त कुष्ठ वसाहतचे अध्यक्ष यांनी कल्याण – डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) धर्तीवर मुंबईतील कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तींनाही १ हजार रुपये आर्थिक मदतीऐवजी २ हजार ५०० रुपये इतकी आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती.
त्यावर मुंबई महापालिका आयुक्त यांनी, १२ मार्च २०२१ रोजी मंजुरी दिली. त्याचप्रमाणे, स्थायी समितीनेही १४ मे २०१४ रोजी मंजुरी दिली. मात्र मंजुरीला उशीर झाल्याने अर्थसंकल्पात त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करता आली नाही. त्यामुळे २०२१ -२२ या आर्थिक वर्षासाठी पालिकेने ४२ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली.
त्याप्रमाणे, पालिकेने जून २०२१ पासून कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तींना दरमहा २ हजार ५०० रुपये आर्थिक मदत देण्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. सध्या ३०० कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तीना आर्थिक मदत देण्यात येत आहे.
त्यामुळे कुष्ठरोग पिडीत दिव्यांग व्यक्तींना मोठा आर्थिक दिलासा मिळण्यात मदत होत आहे.