Twitter : @maharashtracity
मुंबई: आचार्य अत्रे यांच्या जन्मशताब्दी रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने १३ ऑगस्ट २०२३ ते १३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची रुपरेषा निश्चित करण्यासाठी साने गुरुजी विद्यालय, शिवाजी पार्क येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी समितीची स्थापना करण्यात आली.
प्रारंभी आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पंडित वसंतराव गाडगीळ आणि राम नाईक यांनी पुष्पहार अर्पण केला. स्वागताध्यक्ष ऍड अक्षय पै यांच्या हस्ते अध्यक्ष मंडळाचे स्वागत करण्यात आले. ऍड बिना पै, एड् विक्रम पै, अक्षय पै, रेणुका पै, पुण्याहून आलेले नरेंद्र काळे, फौजदार त्याचप्रमाणे निवृत्त नगरसेवक मोहन चौंडकर, प्रज्ञा भिडे, सुशिला भावे, १०७ हुतात्म्यांपैकी अनंत गोलातकर यांची कन्या सुलक्षणा गिरकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
दरम्यान, रौप्य महोत्सव मान्यवरांच्या समितीमध्ये माजी राज्यपाल राम नाईक, शारदा संस्कृत विद्यापीठाचे पंडित वसंतराव गाडगीळ, प्रथितयश समीक्षक डॉ. सोमनाथ कोमरपंत, ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै, चित्रपट निर्माते हर्षवर्धन देशपांडे, अक्षय पै, पुणे येथील आचार्य अत्रे स्मृती प्रतिष्ठानचे अॅड. बाबुराव कानडे, मुलुंड येथील महाराष्ट्र सेवा संघाचे चंद्रशेखर वझे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व मॅनेजमेंट गुरु रविंद्र आवटी, सुप्रसिद्ध निवेदिका शिबानी जोशी, सुरेंद्रभाऊ शंकर शेठ आदी मान्यवरांचा समावेश आहे. समितीच्या कार्यवाहपदी रविंद्र आवटी यांची तर कोषाध्यक्षपदी चंद्रशेखर वझे यांची यावेळी निवड करण्यात आली.
यावेळी अॅड. बाबुराव कानडे यांनी सांगितले की, एका महान विनोद पंडिताची १२५ वी जयंती साजरी करण्यासाठी, त्याची रूपरेषा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आचार्य अत्रे यांनी ५० वर्षे महाराष्ट्राला हसायला शिकवलं त्याचप्रमाणे सतत हसत ठेवलं. त्याप्रमाणे ३६ नाटके, २९ सिनेमे, १५० हून अधिक पुस्तके लिहिली, अशा महान लढाऊ पत्रकाराची शतकोत्तर रौप्य महोत्सव राज्य शासनाच्या वतीने साजरा करण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे.
तर अॅड. राजेंद्र पै यांनी जी मुंबई मिळविण्यासाठी आचार्य अत्रे यांनी कार्य केले, त्या मुंबईत त्यांचे भव्य स्मारक व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. नंतर सर्वांनी एकमुखाने मुंबईत आचार्य अत्रे विश्व विद्यालयाच्या रूपाने भव्य स्मारक उभारावे, असा ठराव करून त्यासाठी पाठपुरावा करण्याचे ठरवले.
माजी राज्यपाल राम नाईक यांनी विविध सूचनांचा पाठपुरावा करणे गरजेचे असून त्यासाठी सरकारी पातळ्यावर कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. पंडित वसंतराव गाडगीळ यांनी आचार्य अत्रे विश्वविद्यालयाची कल्पना सविस्तरपणे मांडली. तसेच सरकारने महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात तसेच भारताच्या विविध प्रांतांमध्ये जन्म रौप्य महोत्सव वर्ष साजरे करण्यास पुढाकार घ्यावा अशी मागणी केली.
डॉ. कोमरपंत यांनी आचार्य अत्रे यांचा हा शतकोत्तरी जयंती रौप्यमहोत्सव गोव्यात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला. नाना जगन्नाथ शंकरशेठ यांचे नातू शंकर भाऊ यांनी आचार्य अत्रे यांनी त्यांच्या आजोबांचा लिहिलेल्या अप्रतिम लेखाची आठवण यावेळी सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका शिबानी जोशी यांनी केले.