@maharashtracity

माहुल येथील प्लॉटवर ऑक्सिजनचा जंबो सिलिंडर भरण्याची सुविधा
२१ कोटी रुपये खर्चून उभारणार ऑक्सिजन प्लांट

मुंबई: मुंबई महापालिकेने विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा मुबलक पुरवठा करण्यासाठी मे. बीपीसीएल माहुलजवळील चिन्हांकित प्लॉटवर ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर भरण्यासाठी २१ कोटी रुपये खर्चून स्वतःचा ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती च्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

मुंबईत कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात जरी पालिका आरोग्य यंत्रणेला यश आले असले तरी अद्यापही कोरोना कायमस्वरूपी हद्दपार झालेला नाही. अनेक रुग्णांचा ऑक्सिजन स्तर कमी झाल्याने व वेळेत ऑक्सिजन न मिळाल्याने मृत्यू झाला आहे. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी जय्यत तयारी केली आहे.

कोरोना संकटाचा सामना करताना मुंबईसह महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ऑक्सिजन’च्या माध्यमातून राज्याला ऑक्सिजन पुरावठ्याबाबत स्वयंपूर्ण करण्याचे सूतोवाच केले होते.

खा. राहुल शेवाळे यांनी आरसीएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, बीएआरसी यांसारख्या आस्थापनांना ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आरसीएफ कंपनीच्या सीएसआर निधीतून गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट उभारण्यात आले. शताब्दीसह पूर्व उपनगरातील वैद्यकीय ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादार यांच्या यंत्रणेवर काहीसा ताण पडत आहे. मुंबई महापालिका सध्या ड्युरा आणि जंबो सिलिंडरचे पुनर्भरण ऑक्सिजन पुरवठादाराच्या रबाळे व तुर्भे येथील प्लांट येथून ऑक्सिजन घेत आहे.

मात्र पालिकेला व खासगी रुग्णालयांना निकडीच्या वेळी या एकमात्र पुरवठादारावर विसंबून राहावे लागत आहे.

त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करता यावा आणि पालिकेने ऑक्सिजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी आता मे.बीपीसीएल माहुलजवळील चिन्हांकित प्लॉटवर ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर भरण्यासाठी ‘ऑक्सिजन बॉटलिंग प्लांट’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मे. बीपीसीएल कंपनीने पाईप लाईनद्वारे ऑक्सिजन बॉटलिंग प्लांटमध्ये दिवसाला जवळपास १० ते १५ मे.टन इतक्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आणि कोविड साथ रोगाच्या काळात ऑक्सिजन विनाशुल्क देण्याचे मान्य केले आहे.

या प्लांटमधील ऑक्सिजनचा वापर करून आणीबाणीच्या काळात दिवसाला ७.१ क्यूबिक मिटर क्षमतेचे (जंबो) १,५०० ऑक्सिजन सिलिंडर भरण्याचे पालिकेचे नियोजन आहे. या प्लांटमधील ऑक्सिजनच्या पुरवठ्यामुळे विविध रुग्णालयांना ऑक्सिजनची गरज भासल्यास विनाअडथळा ऑक्सिजनचा पुरवठा करणे सुलभ होणार आहे.

या ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामासाठी पालिकेने मे. मॅक एंटरप्रायझेस या कंत्राटदाराला कंत्राटकाम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने कार्यादेश मिळाल्यापासून तीन महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.

ऑक्सिजनने भरलेल्या जंबो सिलिंडरची वाहतूक त्याने करून द्यायची आहे. त्यानेच ५ वर्षे या प्लांटची सेवा, देखभाल वगैरे कामे करावयाची आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here