@maharashtracity
मुंबई मानद वन्यजीव रक्षक हे खरे वन्यप्रेमी असून ते जन आणि वन यांना सांधणारा महत्वाचा दुवा आहेत. मानव वन्यजीव संघर्ष कमी करून त्यांचे सहजीवन विकसित करण्यासाठी व्यापक जनजागृती करून हा संघर्ष कमी करण्यासाठीच्या उपाययोजना शासनास सुचवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी आज राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. अशा प्रकारे राज्यातील मानद वन्यजीव रक्षकांशी संवाद साधणारे हे पहिलेच मुख्यमंत्री असल्याची तसेच राज्याला निसर्गस्नेही मुख्यमंत्री लाभल्याची उत्स्फुर्त प्रतिक्रिया मानद वन्यजीव रक्षकांनी दिली. त्यांनी राज्यात हेरीटेज ट्री संकल्पना राबवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार ही व्यक्त केले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वन, वन्यजीव आणि पर्यावरणावरील प्रेम ही मानद वन्यजीव रक्षकांची खरी ओळख आहे. त्यांना त्यांच्या भागात कुठे जंगल आहे, कुठे कोणते वन्यजीव आहेत हे माहित असते. त्यामुळे विकास कामे कुठे व्हावीत आणि कुठे होऊ नयेत याचेही उत्तम मार्गदर्शन ते करू शकतात.
प्रादेशिक वैशिष्ट्ये जपण्याची गरज
जंगलांवर उपजीविका अवलंबून असलेले लोक, बफर क्षेत्रात वस्ती करून राहात असलेले लोक त्यांच्या गरजांसाठी जंगलात जातात आणि त्यांच्यावर वन्यजीवांचे हल्ले होतात. त्यामुळे या नागरिकांना विविध विभागांच्या योजनांचा समन्वय साधुन उपजीविकेसह इतर सुविधा त्यांच्या राहत्या ठिकाणी कशा उपलब्ध होतील याचा प्रयत्न करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, निसर्गात वाघ, बिबटांप्रमाणेच अन्य पशुपक्षी- फुलपाखरे आणि इतर वन्यजीव ही महत्वाची असतात. त्यांची स्थानिक वैशिष्ट्येही असतात या प्रादेशिक वैशिष्ट्यांसह हा निसर्ग जपण्याची आवश्यकता आहे, त्यादृष्टीनेही विचार करावा, मानद वन्यजीव रक्षकांनी यासंबंधीच्या सुचना विभागास द्याव्यात.
अन्न साखळी मजबूत करणारी प्रादेशिक झाडे लावणार
नामशेष होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण करून त्यांचे संवर्धन करणे, नवीन प्रजातींचा शोध, या सगळ्याच गोष्टी पर्यावरणात महत्वाच्या आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
यावर्षी वृक्षारोपण करतांना पशु पक्ष्यांची अन्नसाखळी मजबूत करणाऱ्या आणि स्थानिक वातावरणात रुजणाऱ्या आणि फुलणाऱ्या वृक्षांची बीजे ड्रोनच्या सहाय्याने डोंगरमाथ्यांवर तसेच माणसांचा कमी वावर असलेल्या ठिकाणी टाकण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मानद वन्यजीव रक्षकांबरोबरचा हा संवाद यापुढेही सुरू राहील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यात ३१ जिल्ह्यात ५५ मानद वन्यजीव रक्षकांची नियुक्ती केल्याची माहिती देऊन वन विभागाच्या प्रधान सचिवांनी वन, वन्यजीव आणि पर्यावरण रक्षणातील त्यांचे मोलाचे योगदान अधोरेखित केले.