@maharashtracity
मुंबई: कांदिवली (पश्चिम) मध्ये हिरानंदानी गृह संकुलात आणि आठ अन्य ठिकाणी खासगी स्तरावर आयोजित लसीकरण प्रक्रियेअंतर्गत ९ ठिकाणी बनावट लस (fake vaccination) देण्याच्या घटना नुकत्याच उघडकीस आल्या आहेत.
त्यामुळे आता ही बनावट लस घेणाऱ्या नागरिकांनी पालिकेतर्फे २४ जुलै रोजी कांदिवली (पश्चिम), महावीर नगर परिसरातील ऍमिनिटी मार्केट महापालिका (BMC) लसीकरण केंद्रावर अधिकृतपणे लसीचा डोस देण्यात येणार आहे. मुंबईत आढळलेल्या ९ बनावट लस प्रकरणातील आतापर्यंत शोधलेल्या नागरिकांची यादी पोलिसांकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे. या नागरिकांना योग्यरित्या अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक ती सर्व पडताळणी करुन कार्यवाही सुरु आहे.
दि ३० मे रोजी कांदिवली, हिरानंदानी हेरिटेज क्लब या गृहसंकुलात सोसायटीमार्फत आयोजित खासगी लसीकरण प्रक्रियेअंतर्गत ३९० लोकांचे बनावट व अनधिकृत लसीकरण झाल्याचे उघडकीस आले.
या बनावट लसीकरणाबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलीस चौकशीत ९ ठिकाणी बनावट व अनधिकृत लसीकरणाचे प्रकार घडल्याचे समोर आले.
या लाभार्थ्यांना लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र दिल्याचे तर, काहींची कोविन पोर्टलवर नोंद केल्याचे देखील निदर्शनास आले आहे. पोलीस तपासानुसार ज्या नागरिकांना बनावट लस देण्यात आल्याचा संशय आहे, त्या नागरिकांची यादी पोलिसांनी महापालिका प्रशासनाकडे सोपविली आहे. कोविन संकेत स्थळावर भ्रमणध्वनी क्रमांकाच्या आधारे या नागरिकांची माहिती महानगरपालिका प्रशासनाकडून पडताळण्यात येत आहे.
पडताळणीअंती आणि पोलीस तपासानुसार, खरी लस मिळालेल्या नागरिकांना विहित नियमानुसार कालावधी पूर्ण होताच (कोव्हॅक्सीन असल्यास २८ दिवसांनंतर / कोविशील्ड असल्यास ८४ दिवसांनंतर) दुसरा डोस देण्यात येईल. तर, ज्यांना बनावट लस देण्यात आली, त्यांना योग्य कार्यवाही करुन अधिकृत लस देण्यात येणार आहे.
बनावट आणि अनधिकृत पद्धतीने खासगी स्तरावर लसीकरण झालेल्या या सर्व नागरिकांना न्याय्य व योग्य पद्धतीने अधिकृत लस देण्यासाठी आवश्यक तेथे राज्य आणि केंद्र सरकारकडून देखील मंजुरी घेण्यात येत आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.