@maharashtracity

धुळे:  मोटार वाहन निरीक्षकाच्या (RTO) पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण करून धमकीची पत्रके शासकीय कार्यालयात वाटल्याप्रकरणी निलंबीत आरटीओ निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील, राहुल गोबा पाटील (सोनवणे) उर्फ दादा पाटील यांच्याविरुध्द मुख्य न्यायदंडाधिकारी, व्ही.व्ही.कुलकर्णी यांच्याकडे तीनशे पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले.

हा खटला पुढील सुनावणीसाठी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम.आहेर यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या प्रकरणात वरील दोघा संशयितांकडून जप्त केलेली मोटार कार, सीसीटीव्ही चित्रणांसह विविध सबळ पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात सबळ पुराव्याअंती मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात तीनशे पानांचे दोषारोपपत्र दाखल झाले. 

मागच्या वर्षी जुलै महिन्यात आरटीओ कार्यालयात अज्ञात व्यक्तिने खाकी रंगाची पत्रके कार्यालयातील खिडक्यांमधून प्रत्येक लिपीक, आरटीओ एजंट यांचे कार्यालयात टाकली होती. या पत्रकात एका आरटीओ निरीक्षकाच्या पत्नीबद्दल आक्षेपार्ह लिखाण व धमकीचा मजकूर होता. 
याबाबत पोलिसात तक्रार झाल्यानंतर पोलीसांनी आरटीओ कार्यालयातील  सीसीटीव्ही चित्रण तपासले व तक्रार दाखल केली. या चित्रणामध्ये पोलिसांना खाकी पॅण्ट व पांढरा टि-शर्ट घातलेली एक अज्ञात व्यक्ती तोंडाला रुमाल बांधून पत्रके वाटतांना दिसून आली. त्यानुसार अज्ञात व्यक्तिविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

ही घटना आरटीओ कार्यालयात घडल्याने या घटनेची दखल परिवहन मंत्र्यांनीही गांभीर्याने घेतली होती. एका आरटीओ अधिकार्‍याच्या पत्नीविषयी असा मजकुर लिहून धमकावण्याच्या हा गंभीर प्रकार असल्याने व अशा प्रकारांमुळे परिवहन खात्याची बदनामी होत असल्याने खुद्द परिवहन मंत्र्यांनीच पोलीस यंत्रणेला चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक शिवाजी बुधवंत व मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मुस्तफा मिर्झा यांनी तपासाला वेग दिला.

अखेर या प्रकरणात संशयित आरोपी राहूल गोबा पाटील रा. बोरविहीर, निलंबीत मोटर वाहन

निरीक्षक गजेंद्र तानाजी पाटील रा. दोन दिगर ता. चाळीसगाव जि. जळगाव यांचा सहभाग निष्पन्न झाला. वरील दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला. त्यांना पोलीस उपनिक्षक मुस्तफा मिर्झा यांनी चौकशीला बोलवून सर्व माहिती घेतली. मात्र, वरील दोघा संशयितांनी पोलिसांना सहकार्य न करता उडवा उडवीची उत्तरे दिली.

पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांनी तपासाअंती एमएच १९/सी.व्ही.२४३४ क्रमाकांची मोटर कार जप्त केली. ही कार गजेंद्र पाटील यांच्या चुलत भावाच्या नावाने असली तरीही आरटीओ कार्यालयात या वाहनाचा क्रमांक निलंबीत मोटर वाहन निरीक्षक पाटील यांच्या मोबाईल क्रमांकाला लिंक आहे. 
ही सर्व माहिती तसेच सीसीटीव्ही चित्रण आदी सबळ पुरावे गोळा करुन जवळपास तीनशे पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक मिर्झा यांनी सरकारी अभियोक्ता के.एस.जगपती यांच्याकडे मंजूरीसाठी पाठविले होते. ही मंजुरी मिळताच २२ जुलै रोजी दोन्ही आरोपीतांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here