‘आठ आनेकी मुर्गी और चार आने का मसाला ‘

मुंबई: मुंबई महापालिकेने नद्या, मोठे नाले यांमधील तरंगत कचरा हटवून पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यासाठी प्रथमच ट्रॅश बुमसहित तराफ्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पालिका कंत्राटदाराला ३ वर्षाच्या कामासाठी ४७ कोटी रुपये मोजणार आहे.

वास्तविक, पालिका संपूर्ण मुंबईतील नालेसफाईच्या कामांवर जवळजवळ १०० कोटी रुपये खर्च करते. एवढी नालेसफाईची कामे करूनही शेवटी पहिल्याच पावसात पोलखोल होते. थोडक्यात काय तर तो खर्च नाल्यातील गाळ, कचरा यांच्यासह वाहत समुद्रात जाऊन वाया जातोय. अशातच आता मुंबईतील मोजकेच नाले, चार नद्या यांमधील तरंगता कचरा काढण्यासाठी तब्बल ४७ कोटी रुपये म्हणजे नालेसफाई कामाच्या जवळजवळ ५०% रक्कम या ‘ट्रॅश बुम तराफा’ या प्रणालीवर खर्चण्यात येणार आहे. हे म्हणजे ‘आठ आनेकी मुर्गी और चार आने का मसाला ‘ अशी अवस्था होणार आहे.

यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे.

नद्या, नाल्यांची लांबी ६८९ किलोमीटर

मुंबई महापालिका पर्जन्य जलवाहिन्या खात्याच्या माहितीनुसार, मुंबईत शहर व उपनगरे भागात मोठे नाले, छोटे नाले व मिठी नदी यांची एकूण सुमारे ६८९ किलोमीटर आहे. यापैकी मोठ्या नाल्यांची लांबी ही सुमारे २४८ किलोमीटर इतकी आहे. तर छोट्या नाल्यांची लांबी ही सुमारे ४२१ किलोमीटर आहे. याव्यतिरिक्त उर्वरित २० किलोमीटर एवढी लांबी मिठी नदीची आहे.

नद्या, नाल्यांमधून काढलेल्या गाळाचे परिमाण

संपूर्ण वर्षभरात प्रमुख नाल्यांमधून तीन टप्प्यात सुमारे ४ लाख १३ हजार मेट्रिक टन गाळ काढणे अपेक्षित असते. पालिकेने कंत्राटदारांनामार्फत यंदाच्या पावसाळापूर्व कामाअंतर्गत ३ लाख ११ हजार ३८१ मेट्रिक टन गाळ काढण्याचे निश्चित केले असताना प्रत्यक्षात ३१ मे अखेरीसपर्यंत एकूण ३ लाख २४ हजार २८४ इतका गाळ पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून काढण्यात आला आहे.

यामध्ये, शहर भागात ४३ हजार ७६६ मेट्रिक टन, पूर्व उपनगरात १ लाख ६ हजार २६० मेट्रिक टन, पश्चिम उपनगरांमध्ये १ लाख ८२ हजार २८५ मेट्रिक टन एवढा गाळ काढण्यात आला असून एकूण ११ हजार ४ इतक्या वाहनफेऱया करुन १०४% गाळ वाहून नेण्यात आला आहे, असा दावा पालिकेनेच केला आहे.

मुंबईतील नद्या व नाल्यांमधील कचरा, गाळ, तरंगता कचरा कधीकधी वाहत वाहत समुद्रात जाऊन मिळतो. त्यामुळे समुद्राचे पाणी दूषित होते. या कचऱ्याला रोखण्यासाठी हरित लवाद,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व न्यायालयानेही पालिकेला आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते.

त्यामुळे समुद्रात वाहून जाणारा तरंगता कचरा रोखण्यासाठी ‘ट्रॅश बुम तराफा’ प्रणालीचा वापर करून मिठी, ओशिवरा, पोईसर, दहिसर, वाकोला नद्या, गजधरबंद, मोगरा आदी मोठ्या नाल्यांमधून तरंगता कचरा बाहेर काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी मे. व्हर्गो स्पेशालिटीज प्रा.लि. या कंत्राटदाराला ४७ कोटी रुपयांचे कंत्राट काम तीन वर्षांसाठी देण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here