@maharashtracity

धुळे: धुळे ल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने पाच लाखांचा टप्पा मंगळवारी पूर्ण केला. अवघ्या १४ दिवसांत एक लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. चार लाख लोकांना पहिला तर एक लाख लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकूण उद्दिष्टाच्या ३०.४२ टक्के एवढे लसीकरण झाले आहे.

धुळे जिल्ह्यात दि १९ जूनपासून शासनाने ३० वर्षांवरील नागरिकांचे तर २२ जूनपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू केले. तरुणांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर लसीकरणांचे आकडे झपाट्याने वाढत आहेत. दि २३ जून रोजी जिल्ह्यात लसीकरणचा चार लाखांचा टप्पा पूर्ण झाला. त्यानंतर अवघ्या १४ दिवसांत एक लाख नागरिकांचे लसीकरण झाल्याने मंगळवारी लसीकरणाचा पाच लाखांचा टप्पा पूर्ण झाला आहे. मागील ७ महिन्यांत सर्वाधिक वेगवान लसीकरण २३ जून ते ६ जुलै या कालावधीत झाले आहे.

दि ५ जुलै सोमवारी तब्बल १७ हजार ११८ जणांचे लसीकरण झाले. हा आतापर्यंतच्या लसीकरणाचा उच्चांक आहे. सोमवारी १८ ते ४४ वयोगटातील दहा हजार ५१२ जणांनी लस घेतली. तर मंगळवारी या वयोगटातील पाच हजार ७६४ जणांनी लस घेतली. तसेच मंगळवार दि. ६ जुलैला दिवसभरात दहा हजार ३५९ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात पाच हजार ७६४ लाभार्थी हे १८ ते ४४ वयोगटातील आहेत.

मंगळवारी जिल्ह्यातील एकूण लसीकरण झालेल्या व्यक्तींची संख्या पाच लाख तीन हजार ४५३ झाली आहे. तर एक लाख तीन हजार ३५९ जणांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. जिल्ह्यात १८ वर्षावरील नागरिकांची संख्या १६ लाख ५५ हजार आहेत. त्या तुलनेत लसीकरण झालेल्यांची संख्या पाहता हे प्रमाण ३०.४२ टक्के एवढे आहे. जिल्ह्यातील दोन लाख ६६ हजार ६०९ पुरुष तर दोन लाख ३६ हजार ७४४ महिलांनी आतापर्यंत लस घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here