@maharashtracity

मुंबई: मुंबईत शनिवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी मुंबईत जोरदार पाऊस (heavy rain in Mumbai) पडून मुंबईची तुंबई झाली. काही सखल भागात घरात पाणी शिरले होते. तर कांदिवली येथे ठाकूर कॉम्पलॅक्समधील पे अँड पार्किंगच्या (Pay and Park) जागेत नाल्याचे व पावसाचे पाणी शिरल्याने या ठिकाणी पार्क केलेली तब्बल ४०० वाहने पाण्याखाली गेली.

त्यामुळे वाहनधारक चिंतीत झाले असून त्यांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पालिकेने या वाहनांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.

पाऊस, नाल्यातील पाणी – महापालिका

यासंदर्भात पालिकेने स्पष्टीकरण दिले आहे. आर/दक्षिण विभागामध्ये कांदिवली (पूर्व) येथे ठाकूर संकुल परिसरात वसंत प्राईड इमारतीमध्ये तळघरात वाहनतळ सुविधा विकसित करण्यात आली आहे. या वाहनतळाचे क्षेत्रफळ सुमारे २० हजार चौरस फूट इतके असून इमारत, वाहनतळाच्या शेजारुन आशानगर हा मोठा नाला वाहतो. या नाल्याची रुंदी सुमारे ५ मीटर आहे.

मुसळधार पावसामुळे नाल्यातून वाहणारे पाणी तसेच संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्याच्या बाजूने टेकडीवरुन येणारे पावसाचे पाणी आणि सोबत ९० फूट रस्त्यावरचे पाणी असे सर्व बाजुंनी उतारावरुन प्रवाह आल्याने या तळघरातील वाहनतळामध्ये पाणी भरले.

वाहनतळामध्ये पाणी भरल्याची माहिती मिळाल्यानंतर, आर/दक्षिण विभागातील महापालिकेची यंत्रणा व अग्निशमन दल, पोलीस इत्यादी तेथे पोहोचले. महानगरपालिकेने मोठ्या क्षमतेचे ४ पंप लावून वाहनतळातील पाणी उपसले. वाहनतळाचे क्षेत्रफळ लक्षात घेता, याठिकाणी सुमारे ७० ते ८० लाख लीटर इतके पाणी भरले होते. या सर्व पाण्याचा उपसा करण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेतर्फे देण्यात आली आहे.

मात्र वाहनांच्या नुकसान भरपाईबाबत महापालिकेने कानावर हात ठेवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here