मुसळधार पावसामुळे भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील यंत्रणा बंद झाल्याने पाणीपुरवठा बाधित
पाणी उकळून पिण्याचे आवाहन

@maharashtracity

मुंबई: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण संकुल परिसरात मुसळधार पावसाचे पाणी शिरून जलशुद्धीकरण केंद्रातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे पाणी पुरवठयावर परिणाम झाला आहे.

घाटकोपर (Ghatkopar), भांडुप (Bhandup) परिसरातील पाणी पुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे (Water supply disrupted). घाटकोपर, भांडुप आदी भागांसह अनेक संपूर्ण मुंबईतील पाणीपुरवठयावर परिणाम झाला आहे. पाण्याअभावी नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

भांडुप संकुलातील जलशुद्धीकरण यंत्रणा सुरू करून मुंबईचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

ज्या ठिकाणी नागरिकांनी अगोदरच पाणी भरून ठेवले नव्हते त्या ठिकाणी पाणी न आल्याने नागरिकांचे मोठया प्रमाणात हाल झाले आहेत. त्यामुळे नागरिक पालिकेच्या नावाने शिव्याशाप देत बोटे मोडत आहेत. आज रविवारच्या सुट्टीच्या दिवशी पाण्यावाचून हाल झाल्याने काही नागरिकांना अंघोळही करता आलेली नसल्याचे समजते.

मुंबई महानगर क्षेत्रात काल रात्रीपासून ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. भांडुप परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे, भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी आणि उदंचन संयंत्रामध्ये पाणी शिरल्याने तांत्रिक समस्या उद्भवली आहे.

तसेच खबरदारीचा उपाय म्हणून विद्युत पुरवठा देखील खंडित करावा लागला. भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील समस्येमुळे मुंबई महानगर क्षेत्राला रविवारी होणारा पाणीपुरवठा बाधित झाला आहे.

भांडुप जलशुद्धीकरण संकुलातील गाळणी व उदंचन यंत्रणा दुरुस्त करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. उदंचन यंत्रणा काही तासातच पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. मात्र गाळणी यंत्रणा पूर्ववत होण्यासाठी जास्त कालावधी लागू शकतो. त्यामुळे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर मुंबईकर नागरिकांनी पाणी उकळून नंतर प्यावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

पाणीपुरवठा बाधित होऊन झालेल्या गैरसोयीबद्दल महापालिका प्रशासन दिलगिरी व्यक्त करत आहे. मुंबईकर नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here