By Milind Mane

Twitter: @manemilind70

राज्यातील सर्वाधिक पाऊस कोकणात पडतो. एवढेच नव्हे तर देशांमधील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या भागांमध्ये कोकणातील किनारपट्टीचा भाग येतो. कोकणात एवढा पाऊस पडून अनेक गावे व शहरे पुराच्या पाण्यामुळे पावसाळ्यात वेढली जातात. तरी उन्हाळा आला की अनेक गावांमध्ये तसेच वाड्यांवर पाण्याच्या नावाने ठणठणाट असतो. एवढा पाऊस पडूनही कोकणात मार्च संपला की पाणीटंचाई का? कोकणची घागर दरवर्षी अशीच उताणी राहिल्यास कोकणचे पर्यटन लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता कोकणातील चाकरमानी व्यक्त करीत आहेत.

कोकणात दरवर्षी अडीच हजार ते तीन हजार पाचशे मिलिमीटर पाऊस पडतो. देशाच्या तुलनेत अडीच ते तीन पटीने जास्त पर्जन्यमान कोकणात पडते. परंतु आजपर्यंत कोणतेही सरकार व कोणत्याही पक्षाच्या  लोकप्रतिनिधीला कोकणात पडणाऱ्या पावसाचे पाणी कोणत्या पद्धतीने साठवणूक करता येईल यावर त्यांना नियोजन करता आलेले नाही. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या मार्च महिन्याच्या आतच कोरड्या ठणठणीत पडतात.

उन्हाळ्यात कोरड्या पडणाऱ्या कोकणातील नदीचे दृष्य

कोकणात पडणाऱ्या पावसाचे प्रमाण बघता कोकणात दरवर्षी होणारी पाणीटंचाई ही निसर्गाचे संकट नसून ते मानवनिर्मित संकट आहे, अशी टीका कोकणवासीय आता उघडपणे करू लागले आहेत.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जो पाऊस पडतो, ते पाणी अडवण्याची किंवा जमिनीत जिरवण्याची योग्य व्यवस्था नसल्याने दरवर्षी कोकणातील जिल्ह्यांच्या नशिबी पाणी टंचाई येते.

रखडलेले लघु सिंचन व मध्यम प्रकल्प

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात रखडलेल्या लघु सिंचन व मध्यम प्रकल्पाच्या कामांसाठी कायमच आर्थिक तरतुदीचे कारण पुढे केले जाते. कोकणातील काही प्रकल्पांमध्ये कालवे काढले नसल्याने धरणात पाणीसाठा असूनही अनेक गावातील नागरिकांना त्याचा फायदा होत नाही. त्यामुळे जमीन ओसाड राहण्याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे. याला कोकणातील लोकप्रतिनिधींची उदासीनता कारणीभूत आहे.

ज्या- ज्या वेळेस विधिमंडळात सिंचनावर चर्चा होते, त्या – त्या वेळेस कोकणचे लोकप्रतिनिधी कोकणातील सिंचन व्यवस्थेवर बोलत नाहीत. जे कोणी बोलतात ते फक्त त्यांच्या मतदारसंघातील एखाद्या व त्यांच्या फायद्याच्या असणाऱ्या प्रकल्पावरच बोलले असे गेल्या काही वर्षातील चर्चेवरून दिसून येते. 

नदीपात्रातील साठलेला गाळ काढून नदीपात्रातील प्रवाह बदलण्याचे काम व रेती उत्खनन करण्याचे काम कोकणात सध्या जोमाने सुरू आहे.

कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात जे प्रकल्प रखडलेले आहेत ते लोकांचा हितापेक्षा त्यामध्ये ठेकेदारांचे व सत्ताधारी लोकप्रतिनिधींचे हीच जपले जाते त्यामुळे पाणी समस्येचे मूळ हेच आहे, अशी टीका होत आहे. कोकणातील पाणी समस्या सोडवण्यासाठी मोठ्या धरणांची खरे तर गरज नाही. मोठी धरणे ही खर्चिक व पूर्ण होण्याऐवजी त्यांची कामे रखडली जाण्याची उदाहरणे कोकणात जास्त आहेत. त्या ऐवजी कोकणातील लहान नद्यांवर बंधारे घातले तर त्यासाठी येणारा खर्च कमी असेल.

कोकणात पाणलोटसह जलयुक्त शिवार योजनेची कामे बोगस झाली असून हाताच्या बोटावर मोजता येईल इतक्याच जलयुक्त शिवार योजनेच्या बंधाऱ्यात पाणी साठल्याचे चित्र पाहण्यास मिळते. बाकी जलयुक्त शिवार योजनेचे बंधारे हे फक्त कार्यकर्त्यांच्या हातांना काम मिळवण्यासाठी झाले होते. तसे नसते तर जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेल्या बांधाऱ्यामध्ये पाणी साठले असते आणि कोकणातील पाणीटंचाई कमी झाली असती.

कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात बांधलेले जलयुक्त शिवार योजनेतील बंधारे पूर्णपणे कोरडे ठणठणीत पडले असून काही ठिकाणी तर ते गाळाने भरलेले आहेत. आता तर पूर येतो म्हणून नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाने या बंधाऱ्यातील गाळ काढण्याची मोहीम सध्या कोकणातील पूरग्रस्त क्षेत्रात जोमाने चालू आहे.

पाणी साठवण्यासाठी लाल माती आडवी येते.

कोकणात 2500 ते 3500 मिलिमीटर पाऊस पडूनही कोकणात पाणी साठवणूक करता येत नाही कारण कोकणातील बहुतांशी भाग हा डोंगर उतारा व कापाच्या दगडांनी वेढलेला असल्याने पाणी साठवणूक करता येत नाही. त्यातच लाल मातीची पाणी साठवणूक क्षमता कमी आहे.

कोकणातील मोठ्या प्रकल्प ऐवजी छोट्या नद्यांवर कसे बंधारे बांधता येतील व त्या बंधार्‍यात उन्हाळ्यात कसे पाणी साठवणूक करता येईल. त्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधी सोबतच काम करणाऱ्या जलसंपदा व पाणीपुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याबरोबरच पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे नियोजन व बंधारे बांधल्यापासून त्यात पाणी साठवणूक कसे करता येईल याबाबत कठोर अमलबजावणी करण्याची गरज आहे.

(लेखक मिलिंद माने हे महाड येथील ज्येष्ठ पत्रकार आहेत.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here