मध्यवर्ती मार्ड संतप्त, काळ्या फिती लावून निषेध
Twitter: @maharashtracity
मुंबई: यवतमाळ येथील श्री वसतंराव नाईक सरकारी वैद्यकीय रुग्णालयात गुरुवारी रात्री रुग्णाने निवासी डॉक्टरावर हल्ला केल्याचे पडसाद राज्यभरात उमटत आहेत. हल्ल्यानंतर येथील डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. डॉ. सॅबेस्टियन तपासणी करत असताना सुरज ठाकूर या रुग्णाने चाकूने दोघांवर हल्ला केला. यात डॉ. सॅबेस्टियन यांच्या गळ्याला आणि छातीला जखम झाली आहे. यासोबत आणखी एक डॉक्टर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मध्यवर्ती मार्ड संघटनेचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी या घटनेची माहिती दिली. यवतमाळ सरकारी रुग्णालयात डॉक्टरवर हल्ला झाला असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. यवतमाळ येथील डॉक्टरांनी सर्व सेवा बंद केली आहे. या बंदला सर्व निवासी डॉक्टरांनी पाठींबा दिला असून गरज पडल्यास आम्हीही बंद मध्ये उतरणार असल्याचा इशारा डॉ दहिफळे यांनी मध्यवर्ती मार्ड संघटनेच्या वतीने दिला आहे.
मुंबईसह राज्यातील निवासी डॉक्टर शुक्रवारी दिवसभर काळ्या फिती लावून काम करत आहेत. यवतमाळ येथे डॉक्टरांवर हल्ला झाल्याची ही दुसरी घटना असून डॉक्टरांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब यावेळी निदर्शनात आणून दिली. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टर काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कँडल मार्च काढण्यात येणार आहे.
दरम्यान, हल्ल्यातील आरोपी सूरज ठाकूरला (३६) पोलिसांनी रात्रीच अटक केली. ४ जानेवारी रोजी सरकारी रुग्णालयात सूरज ठाकूर या रुग्णाला दाखल करण्यात आले. सूरज याच्या पोटावर जखमा झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी सॅबेस्टीन एडविन यांची रुग्ण दाखल असलेल्या विभागात रुग्ण तपासणी सुरु होती. त्याचवेळी सूरजने सॅबेस्टीन यांच्या मानेवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात अजून एक डॉक्टर जखमी झाला.
सॅबेस्टीन यांना गंभीर जखमा झाल्याने त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. सॅबेस्टीन यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती यवतमाळ येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयाचे मार्डचे अध्यक्ष डॉक्टर सागर डोळे यांनी दिली.
ऑल इंडिया असोसिएशन संघटनेकडून देशभरात सरकारी रुग्णालयात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याचा तपशील ठेवला जात आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संबंधित माहिती कामी येईल. तसेच सरकारी रुग्णालयात रुग्णासोबत येणा-या नातेवाईकांची संख्या मर्यादित असावी, असे त्यांनी केंद्र सरकारला सुचवले आहे.