ही तर सरकारची पर्यावरण क्षेत्रात घुसखोरी – जयराम रमेश
मुंबई: आरेमध्ये मेट्रो कारशेडचा प्रश्न फक्त आरे कारशेडपुरता मर्यादित नसून, आरेमध्ये कारशेड च्या बहाण्याने आरेच्या पर्यावरण संपन्न क्षेत्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, असा आरोप माजी केंदीय पर्यावरण मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. ते म्हणाले, आम्ही विकासाच्या विरोधात नाही, विकास व्हायलाच हवा, पण विकासामुळे जर पर्यावरणाचा नाश होत असेल तर असा विकास आम्हाला नको आहे.
रमेश यांनी आज आरेतील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या परिषदेला भेट दिली. आरे मेट्रो कारशेड बनविण्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या आदिवासी समाज व सेव्ह आरे संस्थेच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
आरे मध्ये राज्य सरकारने जो मेट्रो कारशेड बनवण्याचा घाट घातला आहे, हे फक्त मेट्रो कारशेड वर थांबणार नाही. त्यानंतर आरे स्टेशन बनणार. विकासकांच्या इमारती उभ्या राहणार. म्हणजेच मेट्रो कारशेडच्या बहाण्याने या आरेच्या हिरव्यागार जमिनीवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशा तीव्र शब्दांत माजी केंद्रीय मंत्री व वन आणि पर्यावरण विभागाचे भारतीय संसदेतील स्थायी समितीचे अध्यक्ष जयराम रमेश यांनी आरे मध्ये मेट्रो कारशेड बनविण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर टीका केली.
जयराम रमेश पुढे म्हणाले की, आरेची ही वनजमीन पर्यावरणाच्या दृष्टीने अति संवेदनशील जागा आहे आणि या जागेवर मागील काही वर्षांपासून मुंबई शहरातील खूप लोकांचा डोळा आहे, हेही तितकेच खरे आहे. मुंबई सारख्या शहराला मेट्रोची गरज आहे, या मताचा मी सुध्दा आहे. विकासाला आमचा विरोध नाही. पण हा विकास सुनियोजित असायला हवा. पर्यावरण व विकासाच्या दरम्यान संतुलन असायला हवं. विकास जर पर्यावरण व नैसर्गिक संपत्तीचा नाश करून, पर्यावरणाला हानी पोहचवून केला जात असेल. तर अशा विकासाला आमचा विरोध आहे. आरे ची जागा ही इको सेन्सिटिव्ह झोन असून मेट्रो कारशेडसाठी एकदम अयोग्य आहे. त्यामुळे येथील जीवसृष्टीला धोका पोहचेल. मेट्रो कारशेड साठी पर्यायी जागा उपलब्ध असून त्यावर मेट्रो कारशेड बांधण्यात यावी, असे तज्ज्ञांनी यापूर्वीच सांगितले आहे. पण राज्य सरकार जाणूनबुजून जनतेची दिशाभूल करत आहे. आम्ही करू तेच बरोबर ही नीती शिवसेना-भाजप सरकारने सोडून द्यावी. कारण हा विकास नसून दबावतंत्र आहे. आरे मध्ये मेट्रो कारशेड आम्हाला नको आहे, आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवायला आमचा विरोध आहे. मेट्रो कारशेड बनविण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध असून पर्यायी जागी ती बनविण्यात यावी, आरे मध्ये नाही.
पर्यावरणाला हानी पोहचता कामा नये, आरे वाचलेच पाहिजे असे मत जेव्हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले, तेव्हा आनंद झाला. पण नुसते बोलून आणि आपले मत व्यक्त करून उपयोग नाही. तर त्यासाठी कृतीही करावी लागते. जर त्यांना खरोखरच पर्यावरणाची काळजी आहे, तर आरेमध्ये मध्ये मेट्रो कारशेड बांधण्याचा निर्णय अयोग्य आहे, तो मागे घेण्यात यावा असे त्यांनी सत्तेतील आपल्या मित्रपक्षाला भाजप ला सांगावे, तेवढे धाडस करून दाखवावे. नुसते बोलून काही होत नाही. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर पर्यावरण या मुद्द्यावर मोठे वकिल बनून फिरतात. पण आपल्या देशातील पर्यावरणाच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही. नरेंद्र मोदी बोलतात एक आणि करतात दुसरेच. विद्यमान आणि येणाऱ्या सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश म्हणाले.