नागपूर: महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यात जमावाकडून (mob lynching) दोन साधूंसह त्यांच्या वाहनचालकाच्या झालेल्या हत्येचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS Sarsanghchalak) डॉ मोहन भागवत (Dr Mohan Bhagwat) यांनी तब्बल आठवड्याच्या कालावधीनंतर निषेध केला आहे. त्याचवेळी अशा घटनेसाठी एखाद्या समाजावर बहिष्कार घालणे चुकीचे असल्याचे मत डॉ भागवत यांनी मांडले आहे.

रा. स्व. संघाच्या नागपूर (Nagpur) महानगरातर्फे रविवारी सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ. भागवत यांनी मार्गदर्शन केले.

पालघर येथे दोन संत आणि त्यांच्या वाहनचालकाच्या झुंडबळीविषयी बोलताना संरसंघचालक म्हणाले की, अत्यंत निरुपद्रवी, समाजावषयी नेहमी चांगला विचार करणाऱ्या दोन संतांची महाराष्ट्रातील पालघर येथे जमावाने हत्या केली. संतांसोबत त्यांच्या वाहनचालकाचीही हत्या करण्यात आली. जे झाले ते योग्य झाले का ?, अशाप्रकारे कायदा हाती घेणे योग्य आहे का ?, पोलिसांनी अशावेळी काय करण अपेक्षित होते ? असे अनेक प्रश्न, आक्रोश मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र, जे झाले त्याबद्दल राग न बाळगता आपल्याला अतिशय धैर्याने पुढे जायचे आहे. मृत संत आणि वाहनचालक यांना २८ तारखेला श्रद्धांजली वाहण्यात येईल, त्यात सर्वांनी सहभागी होऊया.

मने भडकविणाऱ्यांपासून सावध रहा

देशातील परिस्थिती पाहता रा. स्व. संघाने आपले सर्व कार्यक्रम जूनपर्यंत स्थगित केले आहेत. मात्र, काहींनी तसे केले नाही, तसे करणे काही संघटनांना अप्रिय वाटते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी आपल्या मनात निर्माण होणे शक्य आहे. मात्र, त्याचा फायदा आपल्या स्वार्थासाठी देशाचे तुकडे करण्याचा विचार असलेल्या लोकांना घेऊ देऊ नका. त्याचप्रमाणे एखाद्या संघटनेच्या बेजबाबदार कृतीसाठी संपूर्ण समाजाला जबाबदार धरणे, त्यांच्यावर बहिष्कार टाकणे, त्यांच्याविषयी मनात अढी बाळगणे असे करणे अतिशय चुकीचे आहे. देशातील १३० कोटी जनता ही आपलीच आहे, हा विचार मनात बाळगणे अतिशय गरजेचे आहे.

काय म्हणाले सरसंघचालक?

कोरोना (coronavirus) संकटाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे, जगासह भारतही (India) त्याविरोधात लढा देत आहे. ज्याप्रमाणे प्रत्येक संकट काहीना काही धडा देऊन जाते, त्याचप्रमाणे कोरोना संकटानेही स्वावलंबी व्हा असा सर्वांत महत्वाचा धडा देशाला दिला आहे. त्यामुळे आगामी काळात भारताला प्रत्येक बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे लागणार असून परदेशावर कमीत कमी अवलंबून रहावे लागेल. त्यासाठी स्वदेशी उत्पादन पद्धतीस प्राधान्य द्यावे लागेल. त्यासाठी गुणवत्तापूर्ण स्वदेशी उत्पादने बनविण्याकडे लक्ष द्यावे लागेल आणि त्यासाठी सरकारलादेखील तसे धोरण तयार करावे लागणार आहे, असे सरसंघचालक म्हणाले.

देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) संपुष्टात आल्यानंतर समाजाची जबाबदारी अधिक वाढणार असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, यापुढील काळात स्वच्छतेसह पर्यावरण (environment), जैविकशेती (organic farming) याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. संपूर्ण समाजाला कायदे आणि नियमांचे अधिक सजगतेने पालन करावे लागेल. त्याचप्रमाणे समाजात सद्भाव, शांतता टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण समाजाला प्रयत्न करावे लागणार आहेत. सर्वांत महत्वाचे म्हणजे संस्कारक्षम शिक्षणनिती (education policy) आणावी लागणार आहे. सरकार त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करेनच त्यासोबतच नागरिकांनाही तसे वागावे लागणार असल्याचे सरसंघचालकांनी नमूद केले.

संघकार्य अविरत सुरू

कोरोनामुळे संपूर्ण जगातील व्यवहार ठप्प झाले आहे, संघाची नित्यकार्ये, शाखादेखील सध्या बंद आहेत. मात्र, संघकार्य थांबलेले नाही. संघाची सेवाकार्ये प्रचंड प्रमाणात आजही सुरू आहेत. देशातील कानाकोपऱ्यात संघ स्वयंसेवक (swayamsevak) आवश्यक ती मदत करीत आहेत, प्रशासनाला सहकार्य करीत आहेत. त्यामुळे आज जरी दैनंदिन शाखा बंद असल्या तरीह संघकार्य अविरत सुरूच आहे. स्वयंसेवकांनी अतिशय आत्मिक व़ृत्तीने ही कार्ये करावयाची आहेत. कारण स्वत: चांगले बनणे आणि जगालाही चांगले बनविणे हेच खरे संघकार्य आहे. सेवाकार्ये करतानाच लोकांचे प्रबोधनही करणे गरजेचे आहे. कोरोनाचे संकट हे काही अन्य संकटांप्रमाणे साधारण नाही. सेवाकार्ये करताना स्वयंसेवकांनी निद्रा, भय, क्रोध, आळस, दीर्घसूत्रता (काम लांबविणे) आणि तंद्री हा सहा दोषांपासून कटाक्षाने दूर रहावयाचे आहे. परिस्थितीनुसार कार्याचे नियोजन करावयाचे आहे. समाजाची मदत करताना आपली प्रकृतीही व्यवस्थित राहील, याचे भान राखणे गरजेचे आहे. त्याशिवाय सेवाकार्ये करणे शक्य नाही. त्यासाठी मास्कचा (mask) वापर करणे, सतत हात धुणे, आयुष मंत्रालयाने (Ayush Ministry) सुचविलेल्या काढ्यांचे सेवन करणे गरजेचे आहे. सर्वांत महत्वाचे म्हणजे एकांतात आत्मसाधना आणि जीवनात परोपकार हे संघाचे मूळ आहे. त्यासाठी न घाबरता, निराश न होता, न थकता, आपला – परका असा भेद न करता सर्व समाजासाठी काम करणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here