@maharashtracity
धुळे: सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील विविध संस्था, संघटनांनी सोमवारी मोठ्या उत्साहात योगदिन साजरा केला. विविध योगासने, योगाभ्यासाच्या माध्यमातून विविध संघटनांनी या दिवशी वेगवेगळे उपक्रम राबविलेत. या उपक्रमात विविध क्षेत्रातीली मान्यवरांसह जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वर्गही सहभागी झाले होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनावर करोनाचे सावट असल्याने त्या पार्श्वभूमीवर निवडक व्यक्तींच्या उपस्थितीत आरोग्य संवर्धनासाठी योगाभ्यासातून जनजागृती करण्यात अली.
पतंजली योग समिती, क्रिडा भारती, भारत व्यास समिती तर्फे येथील जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी योगदिन झाला. डेलिवुड मिस इंडियाच्या उपविजेत्या संजना निकुंभ, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी, योग प्रशिक्षक डॉ.राजेंद्र निकुंभ, भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी प्रीतमसिंह ठाकूर यांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. त्यानुसार उपस्थितांनी योगासने केली.
यावेळी क्रीडाधिकारी नारायन धंदर, आत्माराम बोथ्रीकर, योगेश देवरे, गुरुदत्त चव्हाण, चंद्रकांत कढरे, योगेश पाटील आदी नागरिक उपस्थित होते.
भाजपातर्फे योगदिन साजरा
भारतीय जनता पार्टीतर्फे येथील अग्रवाल भवनात योग दिन साजरा करण्यात आला. यात वास्तूतज्ञ रवी बेलपाठक, महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, जयश्री अहिरराव, मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. योग शिक्षक अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास करण्यात आला.
पोलीस जिमखान्यात योगदिन
पोलीस जिमखान्यातही योगाभ्यास करण्यात आला. योग शिक्षक जितेंद्र भामरे, संजय गिंदोडिया, मच्छिंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी संजय यादव, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, प्रांताधिकारी भीमराव दराडे यांच्यासह अन्य अधिकार्यांनी योगाभ्यास केला.