@maharashtracity
मुंबई: मुंबई महापालिका दादर येथील शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाबरोबरच आता वरळी येथील जांबोरी मैदानाची दर्जोन्नती, सौंदर्यीकरण करणार आहे. या मैदानातील जॉगिंग ट्रॅकसह मैदानाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामासाठी पालिकेने मे. प्रलिता इन्फ्राप्रोजेक्ट या कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी या कंत्राटदाराला पालिका १ कोटी २० लाख रुपये मोजणार आहे.
यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या आगामी बैठकीत मंजुरीसाठी येणार आहे. मात्र या प्रस्तावात कंत्राटदार या जांबोरी मैदानाची जॉगिंग ट्रॅक व्यतिरिक्त आणखीन कोणकोणती कामे करणार आहे, याबाबतची सखोल माहिती देण्यात आलेली नाही. विषेश म्हणजे वरळी हा राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ असल्याने विरोधी पक्ष व भाजप यांच्याकडून त्यावर आक्षेप घेतला जाण्याची अथवा हा प्रस्ताव रोखला जाण्याची शक्यता पालिका वर्तुळात व्यक्त करण्यात येत आहे.
वरळीच्या जी.एस.भोसले मार्गावरील ऐतिहासिक वारसा असलेले जांभोरी मैदान हे मुंबईचे वैभव आहे. सध्या या मैदानाचा वापर तरुण मुले विविध खेळांसाठी व वरिष्ठ नागरिक थोडावेळ फेरफटका मारण्यासाठी करीत आहेत. खरे तर या ऐतिहासिक मैदानाची काहीशी दूरवस्था झाली आहे. जॉगिंग ट्रॅकची वाताहत झाली असल्याने दुरुस्तीची कामे करणे आवश्यक झाले होते. यास्तव, पालिकेने या मैदानाच्या सुशोभीकरण व सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले आहे.