@maharashtracity

एक हजार कोटींच्या फेरनिविदा

उणे दरातील निविदांना विरोध झाल्याने प्रशासन झाले हतबल

फेर निविदांमुळे रस्ते कामांना विलंब होण्याची शक्यता

मुंबई: रस्ते कामांसाठी कंत्राटदारांनी २६% ते ३०% कमी दरात निविदा भरल्या व कामाची तयारी दर्शवली. मात्र कमी दरात कामे झाल्यास रस्त्यांची कामे दर्जेदार होणार नाहीत, असा आक्षेप घेऊन भाजप (BJP), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी (NCP), समाजवादी पक्षांनी (SP) रस्ते कामांना विरोध दर्शवला. (Congress-BJP opposed 30 percent below tender to construct roads)

अखेर पालिका प्रशासनाला एक पाऊल मागे जाऊन तब्बल १२०० कोटी रुपयांच्या निविदा मागे घ्याव्या लागल्या आहेत. आता पुन्हा रस्ते कामांसाठी १ हजार कोटी रुपयांच्या फेरनिविदा काढण्यात आल्या आहेत.

त्यामुळे विरोधक समाधानी झाले असतील तर सत्ताधारी शिवसेनेला (Shiv Sena) आगामी निवडणुकीच्या तोंडावर या फेरनिविदा प्रकरणामुळे रस्ते कामांना होणारा विलंब सहन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही.

Also Read: खेळाडूंसाठी जलतरण तलाव सुरू करण्याचे आदेश

वास्तविक, यापूर्वी कमी दरात रस्ते व इतर कामे झाली असून त्याबाबतचे प्रस्तावही मंजूर झालेले आहेत.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांनी, कमी दरात जर दर्जेदार रस्ते बनणार असतील तर त्यात पालिकेचाच फायदा होणार आहे तर मग विरोधकांना त्याची पोटदुखी का होतेय, या शब्दात यापूर्वी टीका केली होती.

मात्र आता रस्ते कामांसाठी फेरनिविदा काढल्याने कंत्राटदार पुन्हा कमी दर भरणार की जादा दर भरतील, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. जर रस्ते कामांसाठी कंत्राटदारांनी पुन्हा कमी दर भरले तर प्रशासन व विरोधक काय भूमिका घेणार, कोणता निर्णय घेणार आणि जर कंत्राटदारांनी जादा दर भरले तर त्याचा आर्थिक फटका सत्ताधारी, पालिका प्रशासन सहन करणार का, असे प्रश्न उभे ठाकणार आहेत.

शहर आणि उपनगरातील सिमेंट काँक्रिट, डांबरी व मास्टिक पद्धतीने रस्तेकामे होणार असून पावसाळा वगळून १८ ते २४ महिन्यात ही कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here