@maharashtracity

भाजपने आरोप सिद्ध करावेत – महापौर

मुंबई: कोरोना कालावधीत मुंबई महापालिकेत कलम ६९ सी आणि ७२ चा वापर करून मोठ्या संख्येने प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून त्या माध्यमातून तब्बल ५,७२४ कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, असा खळबळजनक आरोप आमदार योगेश सागर व भाजपचे पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

हे आरोप सिद्ध करावेत, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिले आहे.

मुंबई महापालिकेची सभा, स्थायी समिती सभा व अन्य सभा या ऑनलाईन न घेता प्रत्यक्ष घ्याव्यात, भ्रष्टाचार बंद करावा, पालिका सभांमध्ये पत्रकारांना प्रवेश द्यावा, आदी मागण्यांसाठी बुधवारी भाजपतर्फे नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या दालनासामोर घोषणाबाजी करीत निदर्शने केली.

पालिकेकडूनच नियमांची पायमल्ली, भ्रष्टाचार

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ते आजपर्यंत म्हणजे गेल्या दीड वर्षात कोरोनाशी संबंधित उपाययोजनांच्या नावाखाली पालिका प्रशासनाने, कलम ६९ सी आणि ७२ चा वापर करून कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव परस्पर मंजूर केले. वास्तविक, या नियमांअंतर्गत एखादा प्रस्ताव मंजूर केल्यावर प्रशासनाने किमान पुढील १५ दिवसात त्या संदर्भातील प्रस्ताव स्थायी समिती आणि पालिका सभागृहाच्या मंजुरीसाठी सादर करणे आवश्यक असते.

मात्र, पालिका प्रशासनाने या नियमाचे पालन केले नाही. हे प्रस्ताव खूपच उशिराने मंजुरीसाठी सादर करण्यात येतात. तर कधी कधी ते प्रस्ताव मंजुरीसाठी आणले जात नाहीत. त्यावर स्थायी समितीच्या बैठकीत कायदेशीर मत मागवले आहे. त्यामुळे हा एकूण सर्व प्रकार पाहता पालिकेने अशा प्रस्तावाच्या माध्यमातून तब्बल ५,७२५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. (Prabhakar Shinde alleged BMC for corruption worth crores)

  • – तर पालिका बैठका ऑनलाईन का ?

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादूर्भाव कमी होऊन रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण आणण्यात यश आले आहे. परिणामी मुंबईमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी राज्यात मंदिरे लवकरच उघडण्याची घोषणा केली आहे. लोकसभेच्या बैठका प्रत्यक्ष होत आहेत. तर मग पालिकेच्या बैठका ऑनलाईन का? प्रत्यक्ष बैठका का घेण्यात येत नाहीत, असा सवालही प्रभाकर शिंदे यांनी यावेळी उपस्थित केला.

आरोप सिद्ध करा – महापौर

भाजपकडे (BJP) सध्या काही काम उरलेले नाही. त्यामुळे ते ऊठसूट आरोप करीत आहेत. त्यामुळे आता त्यांनी जे आरोप केले आहेत ते सिद्धही करावेत, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपाला दिले आहे. (Mayor Kishori Pednekar challenges BJP to prove allegations)

भाजपला आताच पोटदुखी का ? -: यशवंत जाधव

सन २०१७ मध्ये मी सभागृह नेता असताना याच नियमांने प्रस्ताव मंजुरीला येत नसल्याची तक्रार केली होती. मात्र, भाजपला आतापर्यत हे का सुचले नव्हते आणि आताच कशी उपरती झाली? आताच भाजपच्या पोटात का दुखायला लागले? असा सवाल स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव (Standing Committee Chairman Yashwant Jadhav) यांनी उपस्थित केला आहे.

पालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजप उगाचच स्टंटबाजी करीत आहे. भाजपला जर मुंबईचा, मुंबईकरांचा एवढाच कळवळा असता तर त्यांच्या नगरसेवकांनी स्वतःचे मानधन पीएम फंडात जमा का केले, (why BJP corporators donated to PM Fund) असा सवालही यशवंत जाधव यांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here