@maharashtracity
मुंबई: पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या घरांचा प्रश्न सोडविण्यासाठी अर्थसंकल्पात जवळपास ७०० कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पुण्यात दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत पोलीस दलाच्या एका कार्यक्रमात वळसे पाटील सहभागी झाले होते.

ते म्हणाले, पोलीस दलातील शिपाई पोलीस आजच्यामितीला सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर सेवानिवृत्त होतो. यापुढे उपनिरीक्षक पदावर सेवानिवृत्त झाला पाहिजे, असा प्रस्ताव गृह विभागाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. यामुळे शासनाच्या आर्थिक तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही. पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी सेवेत वरिष्ठ पदावर काम करण्याची संधी देण्याच्या प्रयत्न आहे, असेही वळसे – पाटील म्हणाले.
गृह विभाग पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पाठीशी खंबीरपणे उभा आहे. नागरिकांचे मित्र म्हणून भूमिका बजावत असताना त्याकडून प्रेम व आस्था मिळविण्यासाठी प्रयत्न करा, असे गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले.