Twitter : @vivekbhavsar

मुंबई

आमचा धर्म आम्हाला कोणासमोरही झुकण्यास मान्यता देत नाही, आम्ही आमच्या आईपुढे देखील आमचं माथा झुकवत नाही. त्यामुळे आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही, अशी ठाम भूमिका समाजवादी पक्षाचे सदस्य अबू असीम आझमी (Samajwadi Party MLA Abu Asim Azmi) यांनी आज विधानसभेत मांडल्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला आणि सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

औरंगाबादमध्ये घडलेल्या घटनेवर अबू आझमी यांनी लक्षवेधी मांडली होती. ते म्हणाले की आफताब पूनावला याने एक मोठे कांड केले. एका मुलीचे (प्रेयसीचा खून करून मृतदेहांचे) तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले. यातून संपूर्ण देशात मुसलमान विरोधात वातावरण पेटले.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील जवळपास सगळ्याच जिल्ह्यात सकल हिंदू आक्रोश रॅली (Sakal Hindu Samaj Jan Akrosh Rally) काढण्यात आली. याद्वारे मुस्लिमांना इतके अपमानित केले गेले की जसे काही या देशात मुसलमान सगळ्यात मोठे देशद्रोही आहेत. अबू आझमी म्हणाले की जेव्हा – जेव्हा देशात कोणाला रक्ताची गरज भासली, तेव्हा – तेव्हा मुसलमान सगळ्यात आधी पुढे आला. आता आम्हाला सांगितले जाते की हा देश तुमचा नाही.

औरंगाबाद येथील २९ मार्च २०२३ रोजी घडलेल्या घटनेचा उल्लेख करून अबू आझमी म्हणाले की, संध्याकाळी ५ वाजता राम मंदिराजवळ तीन युवक मोटारसायकलवर आले. त्यांनी तिथे घोषणा दिल्या. ते म्हणाले की या घटनेसदर्भात दिशाभूल केली गेली. त्या युवकांनी घोषणा दिल्या की तुम्हाला (मुसलमान) वंदे मातरम् (Vande Mataram) म्हणावे लागेल.

आझमी म्हणाले, “मी वंदे मातरम् म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त एकच अल्लाहला मानतो. आम्ही जगामध्ये कोणाच्याही पुढे आमचं मस्तक झुकवत नाही. आम्ही आमच्या आईपुढेही आमचे मस्तच झुकवत नाही. आमचा धर्म आम्हाला कुठल्याही व्यक्तीपुढे झुकण्यास मान्यता देत नाही, सहमती देत नाही.” (Abu Azmi refused to chant Vande Mataram)

आझमी यांच्या या वक्तव्यावर सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी सदस्यांना शांत होण्यास आणि बसण्यास सांगितले. मात्र, सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सभागृहात गोंधळ सुरूच होता.

अध्यक्षांनी अबू आझमी यांना लक्षवेधीतील मुद्द्याच्या पलीकडे जाऊन बोलू नका असे निर्देश दिले. आझमी म्हणाले, त्यानंतर घटनास्थळी पोलिस आले आणि पोलिसांनी दोन्ही समूहातील युवकांना पांगवले. मात्र, संध्याकाळी पुन्हा सुमारे वीस युवक आले आणि पुन्हा घोषणा दिल्या की या देशात राहायचं असेल तर तुम्हाला वंदे मातरम् म्हणावा लागेल.

आझमी बोलण्याचा प्रयत्न करत होते, मात्र सभागृहात गोंधळ सुरू राहिल्याने अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here