मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांच्या टिकेत सरकार धारेवर

Twitter: @maharashtracity

मुंबई: नाशिक देवळाली मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी सोमवारी हिरकणी कक्षाची अवस्था सर्वासमोर आणल्यानंतर मंगळवारी विधीमंडळाच्या पहिल्या मजल्यावर हिरकणी कक्ष सज्ज अवस्थेत दिसून आला. आमदार अहिरे यांची मागणी त्वरीत मान्य झाली असली तरी ही मागणी हिवाळी अधिवेशनातच करण्यात आली होती. तरी देखील मुंबईतील विधीमंडळातील हिरकणी कक्ष दुरावस्थेत होता. 

दरम्यान maharashtra.city च्या  ’विधी मंडळातील हिरकणी कक्ष संकल्पनेची थट्टा‘ या वृत्तानंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) यांनी ट्विट करत हिरकणी कक्षाच्या दुरावस्थेवरुन सरकारला खडे बोल सुनावले. ही तर सरकारची जबाबदारीच आहे. ती पार पाडावयास झेपत नसेल तर आम्ही त्यावर अंमल करावा का? असा सवाल शालिनी ठाकरे यांनी उपस्थित केला होता.

दरम्यान, सोमवारी सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) बाळाला घेऊन हिरकणी कक्षात गेल्या असता तेथील दुरावस्था पाहून त्यांनी विधीमंडळातून काढता पाय घेतला. येथील स्थिती सर्वासमोर मांडताना अहिरे बाळाच्या चिंतेने गहिवरल्या होत्या. हिरकणी कक्ष (Hirakani Kaksha) कसा असावा, कक्षाची रचना कशी असावी, कक्षात काय असावे याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांच्या परिपत्रकाला हरताळ फासत विधीमंडळातील हिरकणी कक्ष उभारण्यात आल्याचे अहिरे यांनी ध्यानात आणून दिले होते. यावर सायंकाळी उशिरा आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली. मात्र, राज्य सरकारने तडक कारवाई करत हिरकणी कक्षात सोयी सुविधांची सज्जता निर्माण केली. यातून मंगळवारी हा कक्ष सुस्थितीत दिसून आला.

मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांचे ट्विट 

सोमवारच्या प्रसारित बातमी नंतर मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी उद्वेग व्यक्त करुन ट्विटवरुन सरकारला खडे बोल सुनावले. हिरकणी कक्ष ही काही मेहरबानी नाही. तर सरकारची जबाबदारी आहे. जर सरकारला झेपत नसेल तर महाराष्ट्र नव निर्माण महिला सेना ती योग्य त्या रितीने पार पाडून दाखवेल, आणि दाखवायला पण लावेल…. अजूनही वेळ गेली नाही… असे ट्विट केल्याने खळबळ उडाली होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here