विरोधी पजक्षनेते अजित पवार यांचा सल्ला

By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: विधिमंडळाच्या कामकाजाची विभागणी करा. ज्या मंत्र्यांना वरच्या सभागृहात काम आहे अशा मंत्र्यांना त्या दिवशी खालच्या सभागृहात काम ठेवू नका. ज्यांना खालच्या सभागृहात काम आहे, त्यांना त्या दिवशी वरच्या सभागृहात काम ठेवू नका. संसदीय कामकाज मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला विधासभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मंगळवारी राज्य सरकारला दिला. सरकारने खबरदारी घेतली नाही तर आम्ही उठणार आणि बोलणार, असा इशाराही त्यांनी दिला.

विधानसभेत प्रशनोत्तराच्या तासानंतर लक्षवेधी सूचना चर्चेला घेण्यात आल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेत असल्याने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Speaker Rahul Narwekar) यांनी पहिल्या दोन लक्षवेधी राखून ठेवल्याचे सांगत थेट चौथी लक्षवेधी पुकारली. ही लक्षवेधी सार्वजनिक आरोग्य विभागाची होती. त्यावेळी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) सभागृहात उपस्थित नसल्याने या लक्षवेधीला उत्तर कुणी द्यायचे, असा पेच निर्माण झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या सूचनेवरून उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्षाने जोरदार आक्षेप घेतला.

अजित पवार यांनी यावेळी सरकारला कामकाज सुरळीत सुरु राहावे म्हणून काही सूचना केल्या. मंत्रिमंडळात २० सदस्य आहेत आणि तेही कॅबिनेट मंत्री आहेत. कोणत्याही सरकारमध्ये खालच्या सभागृहात कॅबिनेट मंत्री तर वरच्या सभागृहात राज्यमंत्री उत्तर देतात. पण या सरकारमध्ये राज्यमंत्री नाहीत. त्यामुळे सरकारला वरच्या आणि खालच्या सभागृहातील कामकाज जुळवून घ्यावे लागेल. आता लक्षवेधी पुकारल्यावर सगळे जण एकमेकांच्या तोंडाकडे बघतात. हे टाळण्यासाठी मंत्र्यांच्या कामाचे वाटप करावे लागेल, असेही पवार यांनी नमूद केले.

आम्ही सत्ताधारी बाकांवर असताना आता कोणत्या मंत्र्यांचे काम आहे याकडे लक्ष देत होतो. ही जबाबदारी संसदीय कामकाज मंत्र्यांची आहे. त्यामुळे लक्षवेधी पुकारल्यावर मंत्री सभागृहात नाहीत, असा प्रसंग आल्यावर आम्ही उठणार, बोलणार आणि अध्यक्षांच्या लक्षात आणून देणार. त्यामुळे अशी वेळ येणार नाही याची खबरदारी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सुनावले. दरम्यान, काँग्रेसचे सदस्य नाना पटोले (Nana Patole) यांनीही मंत्र्यांच्या गैरहजेरीवरून सरकारवर जोरदार टीका केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here