By सदानंद खोपकर

Twitter: @maharashtracity

नागपूर: पुण्यासह राज्याच्या अनेक भागांत कोयता गँगची दहशत पसरविणाऱ्या गुंडांना रोखण्यासाठी त्यांच्यावर मोक्का, तडीपारी यासारखी कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज स्थग़न प्रस्ताव मांडताना केली.

हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तराच्या तासानंतर अजित पवार यांनी कोयता गँगवरील कारवायांचा विषय उपस्थित केला. रात्री- अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरणे, महिलांचे दागिने लुटणे, गाड्यांची मोडतोड करणे, जेवणाचे बिल न भरता हॉटेलमध्ये तोडफोड करणे अशा कारवाया या गॅंगमधील युवक करतात.

पवार म्हणाले, अनेक शहरांतील नागरिक या गँगच्या दहशतीखाली आहेत. कोयता गँगला रोखण्यासाठी, कायदा- सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात यावी. त्यासाठी या गँगच्या गुन्हेगारांना मोक्का लावा, तडीपार करा. त्यांची दहशत कोणत्याही परिस्थितीत मोडून काढा, अशी मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी केली.

अजित पवार पुढे म्हणाले की, पुणे शहर व आसपासच्या उपनगरात ‘कोयता गँग’ची दहशत आहे. पुणे परिसरातल्या मांजरी बुद्रुक, भेकराईनगर, गंगानगर, मुंढवा रस्ता, हडपसर भागात कोयता गॅगच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. राज्यातल्या अनेक शहरात व उपनगरात हीच परिस्थिती आहे. कोयता गँगचे लोण इतर शहरातही वाढत आहे. या गँगकडून रस्त्यावर कोयते परजत दहशत निर्माण केली जात आहे. दहशतीच्या जोरावर ‘कोयता गँग’चे गुंड वर्चस्व निर्माण करत आहेत. कोयता गँगमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश हा सुद्धा गंभीर मुद्दा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here