Twitter: @maharashtracity
By Sadanand Khopkar
मुंबई: गेल्या तीन महिन्यात कर्तव्य बजावत असतांना पोलिसांवर हल्ल्याच्या तीस घटना घडल्या आहेत. राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस २४ तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात; त्यांचे मनोधैर्य खच्ची होऊ नये यासाठी गुन्हे करणार्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करावे व जरब बसवावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.
अजित पवार माहितीचा मुद्दा उपस्थित करताना म्हणाले, राज्यात पोलिसांच्या अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसमवेत फरफटत नेणे, लोकांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनांत वाढ झालेली आहे. एकंदरीतच राज्यात पोलिसांवर विविध ठिकाणी आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत. पोलिसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी आणि मोटारसायकल इत्यादी गोष्टी पुरवण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी आणि पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि हल्ले होऊ नये, यासाठी कठोर उपाययोजना करावी, अशी मागणीही त्यांनी केली.