Twitter: @maharashtracity

नागपूर: “महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मराठी भाषकांवर कर्नाटक सरकारकडून सातत्याने अन्याय होत आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणीवपूर्वक महाराष्ट्रविरोधी वक्तव्ये करुन महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला डिवचत आहेत. कर्नाटकच्या विधीमंडळात सीमा भागासंदर्भातील ठराव मंजूर करताना महाराष्ट्राचा अभिमान, स्वाभिमान, अस्मितेला धक्का लावण्याचं काम झालं आहे. कर्नाटकच्या या आगळीकीला ‘जशास तसं’ उत्तर दिलं पाहिजे. सीमाभागातील मराठी जनतेच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र भक्कमपणे उभा आहे, हा विश्वास देण्यासाठी सीमाभागातील मराठी माणसांच्या लढ्याला संपूर्ण पाठींबा देणारा ठराव आजच सभागृहात एकमतानं मंजूर करावा. सीमाप्रश्नी महाराष्ट्र एकजूट आहे. हा संदेश यानिमित्तानं सर्वांपर्यंत पोहचू द्या,” असं आवाहन विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (LoP Ajit Pawar) यांनी आज सभागृहात केले.

विधानसभेचे कामकाज सुरु होताच प्रश्नोत्तराच्या तासाआधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सीभागातील मराठी माणसांवरील अन्याय आणि कर्नाटक सरकारने त्यांच्या विधीमंडळात मंजूर केलेल्या ठरावाचा मुद्दा उपस्थित केला. कर्नाटक सरकारच्या आगळीकीला महाराष्ट्रानं ‘जशास तसं’ उत्तर देण्याची मागणी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार याावेळी म्हणाले की, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याची महाराष्ट्राबाबत वादग्रस्त वक्तव्ये सुरु आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतरही कर्नाटकच्या विधीमंडळात महाराष्ट्रविरोधी ठराव मंजूर करण्यात आला. महाराष्ट्रातील नेत्यांना कर्नाटकात प्रवेशबंदी करण्यात आली, सीमेवर अटक करण्यात आली. तरीही महाराष्ट्र सरकार गप्प बसलं आहे. सीमाभागातील मराठी माणसांना तिथं बाजू मांडता येत नसल्याने ते आज कोल्हापूरला येऊन त्यांची बाजू मांडणार आहेत.

सीमाभागातील मराठी माणसांवरील कर्नाटकच्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र विधानसभेत एकमतानं ठराव मंजूर करण्यात यावा. कर्नाटक सरकारला ‘जशास तसं’ उत्तर देण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here