By Anant Nalawade

Twitter: @nalawadeanant

मुंबई: मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा संपूर्ण महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. यावर्षी सप्टेबर महिन्यात मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा अमृत महोत्सवी वर्ष सुरु झाले असून हे अमृत महोत्सवी वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले तरी सरकार अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यासंदर्भात गंभीर नाही. मराठवाडा आणि मराठवाड्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाविषयी सरकारची अनास्था आहे, त्यांना यावषयी काही देणे-घेणे दिसत नाही. हे अमृतमहोत्सवी वर्षे साजरे करण्याविषयी सरकारकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत, तरी सरकारने या विषयी आपली भूमिका तातडीने स्पष्ट करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शनिवारी विधानसभेत केली.

पवार म्हणाले, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढा हा सर्वांच्या अस्मितेचा विषय आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. सप्टेंबर महिन्यात या अमृतमहोत्सवी वर्षाची सुरुवात झाली. आता हे वर्ष संपायला अवघे पाच महिने राहिले आहेत. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात आणि मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची मागणी आम्ही सर्वांनी केली होती. याविषयी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सुध्दा हा विषय मी मांडला होता. मात्र अजूनही सरकारकडून या विषयी कोणत्याही हालचाली सुरु नाहीत.

मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करण्याविषयी साधा प्रस्तावसुध्दा सरकारच्यावतीने सभागृहात आणला नाही. सरकार यानिमित्त काय कार्यक्रम साजरे करणार आहे ? त्याचे नियोजन काय ? हे सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले नाही याबाबत पवार यांनी नाराजीही व्यक्त केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here