@vivekbhavsar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयकर विभागाच्या धाडीनंतर प्रतिक्रिया देतांना एक बाब स्पष्ट केली की त्यांना व्यवसाय कळतो आणि ते टॅक्स बुडवत नाहीत तर नियमित टॅक्स भरतात.

राज्याला ‘अजित दादा’ माहीत आहेत. सकाळी लवकर उठून काम सुरू करणारे दादा, काम होणार नसेल तर तोंडावर स्पष्ट सांगणारे कठोर दादा, उगच खोटे आश्वासन न देणारे दादा… आणि ग्राम्य भाषेत गावकऱ्यांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधणारे आणि प्रसंगी गावरान म्हणींचा सहज वापर करून स्वतः टीकेचे धनी होणारे दादा.. असे अनेक रूप या राज्याने बघितले आहेत. परंतु, कॉर्पोरेट पद्धतीने व्यवसाय सांभाळणारे ‘अजित पवार’ सहसा कोणाला माहीत नाही.

तर जाणून घेऊ या अजित पवार यांची ही दुसरी बाजू

राजकारणी अजितदादा आणि कार्पोरेट किंवा व्यावसायिक अजित पवार हे दोन वेगळे चेहरे आहेत, अशी माहिती पवार कुटुंबियांशी कौटुंबिक सबंध असलेल्या व्यक्तीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.

ते म्हणाले, दादा राजकारण आणि व्यवसाय याची कधीही गल्लत करत नाही. याचे उदाहरण देतांना या सूत्राने सांगितले की, असंख्य आमदार कारखान्यातून उत्पादित होणारे स्पिरिट विक्रीचा व्यवसाय करतात. असा एखादा आमदार दादाकडे आला आणि रेट कमी करून द्या अशी विनंती केली तर दादा त्याला स्पष्ट शब्दात नाही सांगतात.

Also Read: देसाई- शिंदे- आव्हाड समर्थकानंतर थेट अजित पवार आयटीच्या रडारवर

“एम डी (व्यवस्थापकीय संचालक) यांना भेटा आणि जो रेट आहे तो द्या, पाच पैसेही कमी होणार नाहीत आणि अजित पवारांचे नावही एम डी ला सांगायचे नाही”, हे अजित दादा यांचे उत्तर असते. ते व्यवसायात कधीही तडजोड करत नाहीत, अशी माहिती या सूत्राने दिली.

स्पिरिट चा दर रोज बदलत असतो आणि तो काही पैशात असतो. त्यामुळे काही पैसे जरी कमी करता आले तर आपला नफा होईल ही व्हावसायिक आमदारांची भूमिका असते. पण, विषय स्पिरिट चा असो वा अन्य कुठलेही उत्पादन, दादा कधीही हस्तक्षेप करत नाहीत आणि एमडी ला फोन करून एखाद्या आमदाराला व्यावसायिक मदत करत नाहीत.

त्यांच्या या रोखठोक भूमिकेचा अनेकांना राग येतो. पण, व्यवसायात तडजोड नाही, ही अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमीका आहे.

राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसरे नेते – जयंत पाटील. हे देखील त्यांचा व्यवसाय कॉर्पोरेट पद्धतीने चालवतात आणि म्हणूनच या दोघांचे कारखाने कायम नफ्यात असतात, अशी पुष्टी या सूत्राने दिली.

अजित पवार यांचे किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली चालविण्यात येणारे किमान अर्धा डझन खाजगी साखर कारखाने (private sugar mills) आहेत, तर जयंत पाटील यांचा सहकारावर (cooperation) विश्वास असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली किमान सहा-सात सहकारी साखर कारखाने (cooperative sugar mills) अत्यंत उत्तमरीत्या सुरू आहेत.

काही हजार कोटींची उलाढाल असलेल्या साखर कारखान्याचा (annual turnover of sugar mills) कारभार हाकताना जयंत पाटील यांचा कॉर्पोरेट चेहरा दिसतो, अशी पुष्टी या सूत्राने दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here