अशोक चव्हाण यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

शिवसेना राष्ट्रवादीकडून दुजोरा तर शिंदे गटाकडून सारवासारव

By अनंत नलावडे

मुंबई: भाजपसोबत सत्ता स्थापन करणे व दसरा मेळाव्यावरून शिंदे -ठाकरे गटात सुंदोपसुंदी सुरु असतानाच माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी एकनाथ शिंदे हे काँग्रेससोबत सत्तास्थापनेसाठी शिवसेना शिष्टमंडळासह आपल्याला येऊन भेटले होते, असा गौप्यस्फोट केल्याने राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे .

अशोक चव्हाण यांच्या या विधानामुळे शिवसेनेत फूट पाडून भाजपबरोबर सत्ता स्थापन केलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची या वक्तव्यावरून खऱ्या अर्थाने सर्वात मोठी अडचण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्यामुळेच चव्हाण यांच्या या विधानावर शिंदे गट आणि भाजपकडून तात्काळ प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे.

अशोक चव्हाण म्हणाले, राज्यात २०१४ ते २०१९ या काळात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असतानाच काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे काही नेते आपल्याला भेटले होते. या नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता.

शिवसेना नेते विनायक राऊत आणि चंद्रकांत खैरे यांनी अशोक चव्हाण यांच्या या विधानाला दुजोरा दिला आहे. अशोक चव्हाण बोलले ते खरे आहे. भाजपबरोबर सरकारमध्ये असताना होणाऱ्या अन्यायावर एकनाथ शिंदे यांनी प्रथम आवाज उठवला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांची समजूत काढली होती. मात्र, आता शिंदे भाजपच्या जवळ कसे गेले हे ईडीच सांगू शकते, असे सांगत शिवसेनेतील गद्दारीची कीड रामदास कदम यांनी रुजवली, अशी टीका विनायक राऊत यांनी केली.

“पृथ्वीराज चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यांच्यासोबत १५ आमदारही जाणार होते. त्यावेळी संजय शिरसाट यांनी हे मला सांगितल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला. मात्र शिवसेना श्रेष्ठींना हे समजल्यानंतर शिंदे मागे वळल्याचा दावाही खैरे यांनी केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिंदे यांच्यावर टीका केली.

दानवे म्हणाले की, आता हेच आम्हाला सांगत आहेत की राष्ट्रवादी नको, काँग्रेस नको. तेच त्यावेळी गेले होते. त्यावेळीच त्यांनी विरोध नोंदवला पाहिजे होता. त्यामुळे त्यांचे खाण्याचे दात वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे आहेत हे जनता बघत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने देखील याला एकप्रकारे दुजोराच दिला आहे. सन २०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा गौप्यस्फोट जर चव्हाण यांनी केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला

शिंदे गट आणि भाजपने अशोक चव्हाण यांना तातडीने प्रत्युत्तर दिले आहे. अशोक चव्हाण यांना चार महिन्यांनी हे का सुचले? २०१४ साली चव्हाण का बोलले नाहीत? एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांना राज्यातून जो पाठिंबा मिळतो आहे त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी चव्हाण बोलले, अशा शब्दात शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांवर टीका केली.

ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे सांगत जे गेल्या काही दिवसात नाराज आहेत, ते अशी वक्तव्य करीत आहेत. त्यामुळे त्याला महत्त्व देण्याची गरज नाही, अशी खोचक प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिली.

भाजपचे नेते आणि मुंबई अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनीही चव्हाणांच्या वक्तव्याचा खरपूस शब्दात समाचार घेतला. अशोक चव्हाण यांची एक क्लिप आम्ही जर जाहीर केली तर त्यांची अडचण होईल, असा इशारा शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. ते आमचे मित्र असून आम्हाला त्यांची अडचण करायची नाही. काही राजकीय प्रथा – परंपरा असतात त्याचा आम्हाला भंग करायचा नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here