शिवसेनेची शिष्टाई विफल; आघाडी तोंडावर आपटणार?

मुंबई
महाराष्ट्र विधान परीषद निवडणुकीत महा विकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला विश्वासात न घेता काँगेसने दुसरा उमेदवार रिंगणात ठेवण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेस पक्षाचा पहिला आणि अधिकृत उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाचा अधिकृत उमेदवार राजेश राठोड हे राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे समर्थक असल्याने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून अंबेजोगाई शहराच्याया बाहेर कोणाला परिचित नसलेल्या राजकिशोर उर्फ पापा मोदी यांची उमेदवारी परस्पर जाहीर केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मराठवाड्याचा नेता कोण? -अशोक चव्हाण की राजीव सातव – या वादाचे पडसाद दुसरा उमेदवार उभे करण्यात झाला आहे.
पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी जालना येथील बंजारा समाजातील राजेश राठोड या एकमेव उमेदवाराचे नाव जाहीर केले. त्यामुळे ९ जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. 
परंतु, शनिवारी संध्याकाळी प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस दोन जागा लढणार असून बीडचे पापा मोदी हे दुसरे उमेदवार असतील असे ट्विट करून जाहीर केले. हा निर्णय जाहीर करतांना थोरात यांनी दोन्ही घटक पक्षाला विश्वासात घेतले नाही, असे सेनेतील सूत्रांनी सांगितले.


शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी शनिवारी रात्री थोरात यांची भेट घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप दिला आणि दुसरा उमेदवाराला माघार घेण्यास सांगावे, असा निरोप दिला. परंतु, थोरात यांनी त्यास नकार दिल्याचे आणि दोन्ही उमेदवार लढत देतील असे स्पष्ट केल्याचे संगीतले असे समजते.
काँग्रेस मधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी पक्ष्याच्या वरिष्ठ नेत्यांची दुसरा उमेदवार देण्याबाबत बैठक झाली. हा निर्णय प्रांतांध्यक्ष थोरात यांनी घ्यावा असे अशोक चव्हाण यांनी सुचवल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील पापा मोदी हे चव्हाण यांचे कट्टर समर्थक. लढत झालीच आणि दुसरा उमेदवार पराभूत झालाच तर त्याचे खापर थोरात यांच्यावर फुटेल. समजा पहिला उमेदवार पडला तरी त्यासाठी थोरात जबाबदार धरले जाईल.
राज्य सभा निवडणूकीत अविनाश पांडे, हुसेन दलवाई यांच्यासह डझनभर ज्येष्ठ नेते इच्छूक असतांना राजीव सातव यांची निवड करण्यात आली. विधान परिषद निवडणुकीत सुमारे १६० उमेदवार इच्छूक होते. प्रांताध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सुचवलेल्या यादीतील सर्व नावे बाद करून सातव यांनी सुचवलेले राजेश राठोड यांना उमेदवारी देण्यात आली.
मिळालेल्या माहिनुसार सातव यांनी हे नाव राहुल गांधी यांच्याकडून मंजूर करून घेतले आणि याची कल्पना थोरात किंवा खरगे यांनाही नव्हती.
अपरिचित असलेल्या राठोड यांच्या उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये भूकंप आला आहे. इच्छूक १६० मध्ये पक्षाला एकही लायक उमेदवार योग्य वाटला नाही का? हा थोरात आणि खरगे यांच्यावर अविश्वास नाही का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चव्हाण यांना नेतृत्व गमावण्याची भीती?
सातव यांचे पक्षात वाढते महत्व लक्षात घेता आणि भविष्यात त्यांची प्रांताध्यक्ष पदावर होणारी संभाव्य नेमणूक बघता पक्षात बंडखोरी उफाळून आली आहे. स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्यानंतर मराठवाड्याचे नेतृत्व अशोक चव्हाण यांच्याकडे चालून आले होते. मात्र, सातव यांच्या माध्यमातून चव्हाण यांच्या या नेतृत्वाला सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेतृत्वाच्या याच लढाईतून चव्हाण यांनी थोरत यांना सांगून दुसरा उमेदवार उभा केला आहे, असे सांगितले जाते.

निवडणूक झाली तर काय होईल?
काँग्रेसने दुसरा उमेदवार द्यायचाच होता, तर किमान ज्याचे नाव माहीत आहे, उद्योगपती किंवा ‘सक्षम’ आहे असा उमेदवार द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रीया पक्षात उमटली आहे. महाविकास आघाडीने ठरवून सहावा किंवा नववा उमेदवार उभा केला असता, तर मतांची बेगमी करता आली असती. आता हा निर्णय काँग्रेस ने घेतला असल्यांने कमी पडणारी मतांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी काँगेसची राहील. शिवसेना किंवा राष्ट्रवादी कँग्रेस यात हस्तक्षेप करणार नाही, असे सेनेतील सूत्रांनी सांगितले.


तर भाजप आघाडीचा उमेदवार पाडेल
कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा अनुभव गाठी असलेली भाजप महाराष्ट्र् विधान परिषद निवडणुकीत मतांची जुळवाजुळव सहज करू शकेल आणि त्यातुन काँग्रेसचा दुसरा आणि महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार पराभूत करू शकेल, असा दावा सेनेने केला आहे. यात काँग्रेसची प्रतिष्ठा धुळीस मिळेल, सोबतच सत्ताधारी असूनही आघाडीचा उमेदवार  पराभूत केल्याचे सिद्ध करून आघाडी सरकार राज्य चालवण्यास कसे लायक नाही, याची ‘टिमकी’ भाजप वाजवतील, अशी भीती या सूत्राने व्यक्त केली.


सचिन सावंत नाराज?

दरम्यान, उमेदवारी न मिळाल्याने पक्ष प्रवक्ते आणि अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य सचिन सावंत नाराज झाले आहेत. ट्विटर अकाऊंट वरील पक्षाचे पद काढून सावंत यांनी नाराजीला व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here