By Sadanand Khopkar 

Twitter: @maharashtracity

मुंबई: शिवाजी पार्क येथे मॉर्निंग वॉकसाठी जात असता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरचिटणीस संदीप देशपांडे (attack on MNS Leader Sandeep Deshpande) यांच्यावर आज झालेल्या हल्ल्याचे पडसाद विधानसभेत उमटले. शिवसेना सदस्य सरवणकर आणि भाजपचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हा विषय सभागृहात उपस्थित करीत देशपांडे यांच्यावरील आक्रमणाचा तीव्र शब्दात निषेध केला.

सदा सरवणकर म्हणाले, संदीप देशपांडे  आक्रमक व कर्तबगार नेते आहेत. आपल्या पक्षाशी एकनिष्ठने काम करतात. त्यांच्यावरील हल्ला दुर्दैवी आहे. भाजप सदस्य आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनाही अनेकवेळा धमकीचे फोन आले आहेत. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना संरक्षण दिले पाहिजे. तर नितेश राणे यांनी, उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांच्यावर संदिप देशपांडे टीका कर असल्यामुळेच या हल्ल्यामागे सरदेसाई यांचा हात असण्याची शक्यता वर्तवली. या घटनेची सरकारने नोंद घेऊन चौकशी करावी, अशी मागणीही राणे यांनी केली.

संदीप देशपांडे यांच्यावर अज्ञातांकडून आक्रमण झाल्यानंतर ते घायाळ झाल्यावर त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. मनसे प्रमुख राज ठाकरे, नेते अमित ठाकरे आणि भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) जाऊन देशपांडे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

या हल्ल्याबाबत देशपांडे म्हणाले, ‘‘आम्ही कुणालाही भीक घालत नाही. यामागे कोण आहेत, हे मला माहीत आहे. पण आम्ही त्यांना घाबरणारे नाही.’’ 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here