@maharashtracity

काँग्रेसविरोधात भाजपची तक्रार

भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास यांच्यावर कारवाईची मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोत टिपू सुलतानचा चेहरा लावल्याचा आरोप

भाजप नगरसेवक गटाकडून आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

मुंबई: भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशी छेडछाड करून त्याजागी टिपू सुलतानचा चेहरा लावलेले छायाचित्र ट्विट केल्याचा गंभीर आरोप करीत मुंबई महापालिका भाजप गटनेते प्रभाकर शिंदे, आ.मिहीर कोटेचा, पक्षनेता विनोद मिश्रा यांनी केला आहे.

या नगरसेवकांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर यांच्याकडे श्रीनिवास यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी चौकशी करून पोलिसांनी भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. (Youth Congress National President Shrinivas B V) यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपा गटनेता प्रभाकर शिंदे (BJP corporator Prabhakar Shinde) यांनी केली आहे.

यावेळी नगरसेवक कमलेश यादव, अभिजित सामंत,भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तमाम भारतीयांचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) अश्वारूढ फोटोशी छेडछाड करून त्याजागी क्रूरकर्मा टिपू सुलतानचा (Tipu Sultan) चेहरा लावून ते छायाचित्र भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले.

त्यांचे हे कृत्य छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे आणि तमाम हिंदूंच्या (Hindu) भावना दुखावणारे असून यातून काँग्रेसच्या (Congress) हिणकस प्रवृत्तीचे दर्शन होते. या घृणास्पद कृत्याचा भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने तीव्र निषेध करण्यात येत आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया गटनेते प्रभाकर शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

समाजवादी पक्षाच्या (Samajwadi Party) एका नगरसेविकेने काही कालावधीपूर्वी मानखुर्द (Mankhurd) येथील पालिकेच्या प्रस्तावित उद्यानाला टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी केली असता त्यास त्यावेळी भाजप नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता.

त्यावेळी महापालिका मुख्यालय भाजपने दणाणून सोडले होते. आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोशी छेडछाड करून त्यांच्या चेहऱ्याच्या जागेवर टिपू सुलतान याचा चेहरा लावून तसा फोटो भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.वी. यांनी स्वतःच्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केल्याचा आरोप भाजपतर्फे करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजप नगरसेवक टिपू सुलतान प्रकरणावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता असून संपूर्ण विश्वात त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. श्रीनिवास यांनी शिवरायांच्या फोटोशी छेडछाड करून तमाम हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपूचा फोटो लावणे ही घटना अतिशय गंभीर असून यातून हिंदू द्वेषाची स्पष्टता होते,असा घणाघाती आरोप आमदार मिहीर कोटेचा (BJP MLA Mihir Kotecha) यांनी केला आहे.

वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान भाजप कदापि सहन करणार नाही. याप्रकरणी पोलिसांनी श्रीनिवास यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता पक्षाच्या वतीने सडेतोड उत्तर देण्यात येईल, असा इशारा आमदार मिहीर कोटेचा यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here