@maharashtracity

भाजप नगरसेविका योगिता कोळी यांची मागणी

मुंबई: भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार व्हावे यासाठी बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून (BMC schools) भगवत गीता पठन केले जावे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका योगिता कोळी (BJP Corporator Yogita Koli) यांनी केली आहे.

योगिता कोळी यांनी महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांची भेट घेऊन त्यांना भगवद्गीतेची (Bhagwat Geeta) प्रत भेट दिली आणि महापालिकेच्या येत्या सभेत पालिका शाळेत भगवत गीता पठण करण्याचा ठराव मांडला जावा, अशी मागणी केली.

योगिता कोळी यांनी निवेदनात असे नमूद केले आहे की, भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान विषयक ग्रंथ आहे. तसेच हा ग्रंथ वेदांच्या अखेरच्या रचनेतील ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.

५००० वर्षांपूर्वी २५ डिसेंबर या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. भगवत्‌ गीता हा हिंदुस्थानातला अतिशय महत्त्वाचा व मानवी इतिहासातल्या ग्रंथांपैकी अतिशय तत्त्वज्ञानावर आधारलेला महत्त्वाचा संदर्भग्रंथ आहे.

महाभारतातल्या (Mahabharat) महायुद्धाच्या वेळेस भगवान श्रीकृष्णांनी गीता अर्जुनास मार्गदर्शन स्वरूपात सांगितली, असे महाभारताच्या कथेत म्हटले आहे. हा ग्रंथ मानवाला परमोच्च ज्ञान देतो आणि जीवन कसे जगावे यांचे मार्गदर्शन करतो असे मानले जाते. सामान्य जनांमध्ये भगवत्-गीता, ‘गीता’ या नावाने ओळखली जाते.

हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाचा मार्गदर्शकपर ग्रंथ आणि मानवी जीवनाचे तत्त्वज्ञान सुखकर करण्याकरता उपयुक्त ठरेल असा संदर्भग्रंथ असे या गीतेचे स्वरूप आहे. जगातील विविध देशांतले व विविध धर्मांतले असंख्य तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ आणि विचारवंत यांनी या ग्रंथाबद्दल कायमच गौरवोद्गार काढले आहेत आणि मानवी जीवनाच्या अथांग सागरामधे गीतेला दीपस्तंभाचे स्थान दिले आहे.

गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला ‘मोक्षशास्त्र’ म्हणले गेले आहे. तरी ही वस्तुस्थिती लक्षात घेता बृहन्मुंबई महापालिकेचे असे ठाम मत आहे कि, बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांमधून भगवत गीता पठन केले जावे. जेणेकरून भावी पिढीवर योग्यप्रकारचे संस्कार होतील.

आपल्या मागणीचा विचार होऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार करून अहवाल सादर करण्याची आयुक्तांना विनंती करण्यात यावी. या ठरावाची सूचना अंतिम निकाली लागेपर्यंत महानगरपालिकेच्या कार्यक्रम पत्रिकेवर समाविष्ट करण्यात यावी अशी विनंती योगिता कोळी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here